
>> स्पायडरमॅन
अमेरिकेने अनेक देशांवर जोरदार टॅरिफ लावून जगात खळबळ माजवली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना असे करण्याचा कायदेशीर अधिकार आहे का यावर सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या चर्चेच्या दरम्यान जगभरात असलेल्या चित्र-विचित्र कायद्यांविषयी देखील लोक इंटरनेटवर मोठय़ा उत्साहाने माहिती देत आहेत. जगातील अनेक संपन्न आणि सुशिक्षित देशातदेखील लागू असलेले काही विचित्र नियम पाहिले की काय बोलावे हेच सुचत नाही.
चीनसारख्या प्रगत देशात एक कायदा माणसाचा मरणानंतर देखील पिच्छा न सोडणारा आहे. इथे 2007 साली लागू झालेल्या एका कायद्यानुसार तिबेटी बौद्ध भिक्कूंना पुनर्जन्म घेण्यापूर्वी अधिकृत सरकारी परवानगी घेणे आवश्यक आहे. थायलंडमध्ये जुगारासंदर्भातले कायदे अत्यंत कडक मानले जातात. इथे कोणत्याही व्यक्तीला 120 पेक्षा जास्त पत्ते आपल्याजवळ बाळगता येत नाहीत. तर थायलंडच्या अजून एका विचित्र कायद्यानुसार इथे अंडरपँट न घालता घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आलेली आहे. तर पाकिस्तानात दुसऱया व्यक्तीचा फोन त्याच्या परवानगीशिवाय हाताळणे हा अपराध मानला जातो. असे करणाऱ्यास 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
विदेशातील अनेक शहरांत सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेणे ही सामान्य गोष्ट समजली जाते. मात्र फ्रान्ससारख्या शहरात यावर कायद्याने बंदी घालण्यात आलेली आहे. इथल्या रेल्वेगाडय़ांना होणारा उशीर रोखण्यासाठी 1910 सालापासून हा नियम करण्यात आला आहे. तर याच देशातल्या काही शहरांमध्ये तुम्ही मरण्यापूर्वी तुमची दफन करण्याची जागा विकत घेऊन ठेवणे गरजेचे आहे. तुमच्याकडे अशी जागा खरेदी केलेली नसल्यास तुमचा मृत्यू हा बेकायदेशीर मानला जातो. तर अमेरिकेतील अल्बामामध्ये रविवारी डॉमिनोज खेळण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. लोकांनी खेळण्यात वेळ न घालवता चर्चमध्ये जावे यासाठी हा नियम करण्यात आला आहे. स्पेनसारख्या सुंदर शहरात निसर्गाचे रक्षण म्हणून समुद्रकिनारी रेतीचे किल्ले बनवण्यास मनाई करण्यात आलेली आहे.






























































