सुवर्णसंधी! सोने 25 हजारांनी स्वस्त, चांदीही फिकी… 24 तासांत दर 85 हजारांनी उतरला

बातमी शेर करा :
सामना फॉलो करा

गुरुवारी सोने-चांदीने सर्व रेकॉर्ड मोडून उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र अवघ्या 24 तासांत दरवाढीचा बुडबुडा फुटला.  सोने-चांदीच्या दरातील तेजीला आज मोठा ब्रेक लागला. सोने 25 हजार रुपयांनी तर चांदी 85 हजार रुपयांनी आपटली. या घसरणीने बाजारात एकच खळबळ उडाली असून खरेदीदारांसाठी मात्र सुवर्णसंधी चालून आली आहे.

जागतिक आणि स्थानिक बाजारांतही सोने-चांदीच्या दरात शुक्रवारी जबरदस्त घसरण दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमएलसी) गुरुवारी चांदीने 4,20,048 रुपयांचा उच्चांक गाठला होता. मात्र यानंतर शुक्रवारी 3.30 वाजता मार्च वायदा व्यवहारात चांदी 65,000 रुपयांनी घसरून 3,35,001 रुपयांवर आली. अर्थात 24 तासांचा विचार करता, चांदी जवळपास 85,000 रुपयांनी घसरली आहे.

सोन्याचा विचार करता, गुरुवारी सोने 1,93,096 रुपयांवर पोहोचले होते, जे आता 25,500 रुपयांच्या घसरणीसह 1,67,406 रुपयांवर आले.

गुरुवारी मौल्यवान धातूंच्या दरात झालेली मोठी घसरण म्हणजे ‘करेक्शन’ असल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय मार्पेटमध्ये दर जास्त वाढलेत असे वाटले की हे ‘करेक्शन’ येते. यात विशेष असे काही नाही. एका दिवसात झालेली ही घडामोड असते. उद्या दर पुन्हा वाढू शकतात. या आठवडय़ात सोने पुन्हा 1 लाख 85 हजारांचा टप्पा गाठेल, अशी शक्यता असल्याचे  ज्वेलर्स आनंद पेडणेकर यांनी सांगितले.

घसरण कशामुळे

तज्ञांच्या मते, गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या दरवाढीनंतर गुंतवणूकदारांनी आपली नफावसुली सुरू केल्याने ही घसरण दिसत आहे. काही तज्ञांच्या मते सोने आणि चांदीमध्ये विक्री वाढली तशी काही शॉर्ट सेलर्सलने एण्ट्री केली. त्यामुळे चांदीच्या दरात घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी आणि धातूंच्या दरात घसरण पाहायला मिळाली. यामुळे मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोने आणि चांदीच्या दरावर परिणाम पहायला मिळाला.

  • घसरणीचा थेट परिणाम गोल्ड आणि सिल्वर ईटीएफवर झाला असून त्यांचे दर 20 टक्क्यांपर्यंत तुटले आहेत. आयसीआयसीआय सिल्वर ईटीएफ 20.14 टक्के,  निप्पॉन इंडिया सिल्वर, 18,59 टक्के तर टाटा गोल्ड ईटीएफ 9.16 टक्क्यांनी घसरले.

चढ-उतार सुरूच राहणार

अमेरिकेतील ट्रम्प सरकारची लहरी धोरणे आणि जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता यामुळे सोने आणि चांदीच्या दरांत चढ-उतार सुरूच राहणार, असा बाजार तज्ञांचा अंदाज आहे. तूर्त दर स्थिर किंवा आणखी काही प्रमाणात कमी होऊ शकतात, असे सांगण्यात आले.

गुंतवणूकदारांना 3 लाख कोटींचा झटका

सोने आणि चांदीचे दर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. सोने प्रतितोळा 2 लाखांच्या उंबरठय़ावर होतं तर चांदीही प्रतिकिलो साडेचार लाखांचा टप्पा गाठेल, असा अंदाज होता. त्यामुळे सोने-चांदीत गुंतवणूक वाढली होती. आज हा फुगा फुटल्याने गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला. गुंतवणूकदारांचे 3 ते 12 टक्के नुकसान झाले. काही मिनिटांत तब्बल 3 लाख कोटींचा फटका गुंतवणूकदारांना बसला.