
पुस्तकांवर प्रेम करणे म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाला अर्थपूर्ण बनवणे आणि ज्ञानाच्या माध्यमातून समृद्ध होणे, असे म्हटले जाते. परंतु कर्नाटकातील एका 77 वर्षीय आजोबांनी आपल्या आयुष्यात मिळणाऱ्या पगाराच्या 80 टक्के रक्कम ही स्वतःवर खर्च न करता ती पुस्तकावर खर्च केली आणि 20 टक्के रक्कम ही स्वतःसाठी वापरली. 80 टक्के रकमेतून खरेदी केलेल्या पुस्तकातून घरीच एक देशातील सर्वात मोठे ग्रंथालय तयार केले आहे. याची दखल घेत केंद्र सरकारने या आजोबांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे ठरवले आहे. आजोबांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
एनके गौडा असे या आजोबांचे नाव असून ते 77 वर्षांचे आहेत. कर्नाटकातील मांडया जिह्यातील हरलहल्ली या गावात त्यांचे वास्तव्य आहे. त्यांनी तयार केलेल्या या ग्रंथालयात तब्बल 20 लाखांहून अधिक पुस्तके आहेत. त्यांचा संपूर्ण दिवस या पुस्तकामध्ये रमून जातो. रस्त्याच्या कडेला असलेल्या त्यांच्या या ग्रंथालयाला बाहेरून पाहिल्यावर फार काही कळत नाही, पण आत गेल्यावर पुस्तकांचा साठा पाहायला मिळतो. एनके गौडा हे काही श्रीमंत कुटुंबातील व्यक्ती नाहीत. सुरुवातीच्या काळात ते बस कंडक्टर होते. त्यानंतर साखर कारखान्यात त्यांनी जवळपास 30 वर्षे काम केले. पुस्तकांच्या वेडापायी त्यांनी पगाराचा 80 टक्के भाग यावर खर्च केला. पुस्तके खरेदी करण्यासाठी त्यांनी म्हैसूरमधील मालमत्ताही विकली. पैशांच्या कमतरतेमुळे ते देखभालीसाठी कोणताही कर्मचारी ठेवू शकले नाहीत. पत्नी आणि मुलासोबत ते ग्रंथालयातच राहतात. फरशीवर झोपतात. एका छोटय़ा कोपऱ्यात जेवण बनवतात. गौडा यांच्या ग्रंथालयात पुराण, उपनिषदे आणि कुराण, दोन ते तीनशे वर्षे जुनी इतिहासाची पुस्तके, याशिवाय रामायण आणि महाभारताच्या प्रत्येकी तीन-तीन हजार आवृत्त्या आहेत. महात्मा गांधींवर अडीच हजारांहून अधिक पुस्तके आहेत.
























































