
इंडोनेशियाच्या एका मोठय़ा उद्योगपतीला मोठे नुकसान सोसावे लागले आहे. इंडोनेशियाच्या शेअर बाजारात मोठी पडझड झाल्यानंतर अनेक श्रीमंतांना जोरदार झटका बसला आहे. सर्वात जास्त फटका इंडोनेशियातील उद्योगपती प्रजोगो पंगेस्टु यांना बसला आहे. त्यांच्या कंपनीचे शेअर घसरल्याने त्यांना जवळपास 8.27 लाख कोटी रुपये नुकसान सोसावे लागले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार, प्रजोगो पंगेस्टु यांची एकूण संपत्ती आता कमी होऊन 31 बिलियन डॉलर राहिली आहे. अवघ्या एका महिन्यात त्यांच्या संपत्तीत 15 बिलियन डॉलरची कमी आली आहे. प्रजोगो यांची एनर्जी कंपनी बॅरिटो पॅसिफिकमध्ये 71 टक्के भागीदारी आहे, तर कोळसा आणि सोन्यासंबंधी व्यापाराशी जोडलेली कंपनी पेट्रिंडो जया क्रियासीमध्ये त्यांची 84 टक्के भागीदारी आहे. या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये 12 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे.
हिमाचल प्रदेशात पाऊस आणि बर्फवृष्टीचा इशारा
हिमाचल प्रदेशात 22 ते 29 जानेवारी यादरम्यान 25.1 मिलीमीटर सामान्य पाऊस होतो, परंतु या वेळी 94.9 मिलीमीटर पाऊस झाला आहे. पुढील दोन आठवडे पाऊस आणि बर्फवृष्टी होत राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. याची सुरुवात 1 फेब्रुवारीपासून सुरू होईल. या दिवशी सर्व 12 जिह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात 3 फेब्रुवारीपर्यंत हवामान खराब राहील, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
वंदे भारत ट्रेनवर दगडफेक, गुजरातेत दोघांना अटक
गुजरातमधील वलसाड येथील वापीजवळ वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक केल्याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाने दोन जणांना अटक केली आहे. ट्रेन आणि इंजिनला लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजद्वारे या आरोपीची ओळख पटवण्यात आरपीएफला यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सतेंद्र कुमार ऊर्फ छोटू आणि श्रीपाल शिवनरेश या दोघांचा समावेश आहे. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर वंदे भारतवर दगडफेक केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
कुवेतहून दिल्लीला येणाऱ्या इंडिगो विमानाला धमकी
कुवेतहून दिल्लीला येणाऱ्या इंडिगोच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची आणि विमान हायजॅक करण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीमुळे अहमदाबाद विमानतळावर विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आहे. एका टिशू पेपरवर लिहिलेल्या नोटमध्ये विमानाला हायजॅक करणे आणि बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. या घटनेआधी 18 आणि 22 जानेवारीलाही अशीच धमकी मिळाली होती. 18 जानेवारीला दिल्लीहून पश्चिम बंगालच्या बागडोगरा जात असलेल्या इंडिगो विमानाला धमकी मिळाली होती, तर 22 जानेवारीला दिल्लीहून पुण्याला जात असलेल्या इंडिगो विमानाला धमकी मिळाली होती.
पाकिस्तानला न जाण्याचा अमेरिकन नागरिकांना सल्ला
अमेरिकेच्या विदेश विभागाने आपल्या नागरिकांना पाकिस्तानला न जाण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तानातील सुरक्षा, गुन्हेगारी, अशांतता, दहशतवाद आणि अपहरण यांसारख्या घटना वाढल्या आहेत. यामुळे अमेरिकन नागरिकांनी पाकिस्तानला जाऊ नये, अशा सूचना अमेरिकन विदेश विभागाकडून देण्यात आल्या आहेत. पाकिस्तानात कधीही आणि कुठेही दहशतवादी हल्ला होऊ शकतो. ट्रान्सपोर्ट हब, हॉटेल, बाजार, शॉपिंग मॉल, विमानतळ, शाळा, रुग्णालय, पूजा स्थळ, पर्यटन स्थळ, सरकारी इमारती सुरक्षित नसल्याने या ठिकाणी हल्ला होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. खैबर पख्तूनख्वाचा काही भाग सर्वात धोकादायक लेवल 4 मध्ये टाकला आहे. या ठिकाणी अमेरिकन नागरिकांनी प्रवास करू नये, असा सल्ला दिला आहे.
























































