
महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांपासून राजकारणी, पोलीस प्रशासनातील व्यक्तींपर्यंत अनेकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या डब्ल्यू जे कंपनीच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कंपनीचा मालक व व्यवस्थापकीय संचालक समीर नार्वेकर, त्याची पत्नी नेहा नार्वेकर आणि संचालक अमित पालम यांना शुक्रवारी अटक केली आहे. राज्यभर चर्चेत असलेल्या या घोटाळ्याची रक्कम सुमारे १,२०० कोटी रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
टीडब्ल्यूजे कंपनीने विविध योजनांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले होते. सुरुवातीला काही प्रमाणात परतावा देण्यात आल्यानंतर अचानक कंपनीने व्यवहार बंद केले. यामुळे हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.
या प्रकरणात काही दिवसांपूर्वी रत्नागिरी पोलिसांनी कंपनीचा संचालक संकेत भाग याला अटक केली होती. त्यानंतर तपासाला गती मिळाली होती. दरम्यान, फसवणूक उघडकीस आल्यानंतर समीर नार्वेकर महाराष्ट्राबाहेर पळून गेल्याची माहिती समोर आली होती. मात्र, ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे त्याला ताब्यात घेत ही मोठी कारवाई केली.
टीडब्ल्यूजे कंपनी घोटाळ्यात अनेक मोठ्या व्यक्तींची गुंतवणूक असल्याची चर्चा असून, काही संचालक व स्थानिक मध्यस्थांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून सखोल चौकशी सुरू असून, फसवणुकीचा नेमका आकडा व आर्थिक व्यवहारांचे तपशील लवकरच समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.पती-पत्नीला अटक झाल्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, येत्या काळात आणखी अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.



























































