
टी-20 वर्ल्ड कप 2026 अजून सुरूही झालेला नाही आणि त्याआधीच क्रिकेटविश्वात पाकिस्तानची पंचाईत चांगलीच गाजू लागली आहे. पाकिस्तान स्पर्धेबाहेर पडू शकतो, अशा चर्चांनी सोशल मीडियावर इतका धुमाकूळ घातला की, मैदानात खेळ होण्याआधीच ट्विटरवर कॉमेडी लीग सुरू झाली आहे. या हशाच्या पावसात आधी आइसलॅण्ड आणि आता थेट युगांडाने उडी घेत, ‘सीट रिकामी असेल तर आम्ही तयार आहोत’ असे म्हणत पाकिस्तानची चांगलीच फिरकी घेतली आहे.
गुरुवारी युगांडा क्रिकेटच्या अधिकृत अकाऊंटवरून केलेल्या पोस्टने तर पाकिस्तानच्या जखमेवर मीठच चोळले. जागा रिकामी झाली तर आमचे पासपोर्ट, पॅड, किट सगळं तयार आहे, असे सांगत युगांडाने स्पष्ट केलं की ते मैदानात उतरण्याइतकेच नव्हे, तर पाकिस्तानची जागा घेण्याइतकेही तयार आहेत. पोस्टमधील मिश्किल शब्द आणि टोन पाहता हा टोमणा कोणासाठी आहे, हे वेगळं सांगायची गरजच उरली नाही.
या सगळ्या हशामागे पार्श्वभूमी मात्र गंभीर आहे. पाकिस्तानी संघ बांग्लादेशच्या समर्थनार्थ टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याचा विचार करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यावरूनच सोशल मीडियाने पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे. बांगलादेशने सुरक्षेचे कारण पुढे करत सामने हिंदुस्थानऐवजी श्रीलंकेत घेण्याची मागणी केली होती. मात्र आयसीसीने ही मागणी धुडकावून लावल्यानंतर बांगलादेशनेच स्पर्धेपासून माघार घेतली आणि इथूनच पाकिस्तानच्या नावावर विनोदांची मालिका सुरू झाली.
या मिश्किल परंपरेची सुरुवात गुरुवारी आइसलॅण्ड क्रिकेटने केली होती. ‘पाकिस्तान खेळणार नसेल तर आम्ही उपलब्ध आहोत, फक्त वेळेत कळवा,’ असे म्हणत आइसलॅण्डने पीसीबीला थेट टॅग केलं आणि हे ट्विट अक्षरशः व्हायरल झाले.






























































