साडेपाच तासांच्या झुंजीनंतर अल्काराज अंतिम फेरीत, आता रविवारी रंगणार जोकोविचशी ग्रॅण्डस्लॅम युद्ध

बातमी शेर करा :
सामना फॉलो करा

जिद्द, वेदना आणि अफाट प्रतिभेचा प्रत्यय देत कार्लोस अल्काराजने पाच सेट्सच्या अटीतटीच्या लढतीत अॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचा पराभव करत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या विजयासह 22 वर्षीय अल्काराजने इतिहास रचत चारही ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचणारा सर्वात कमी वयाचा पुरुष खेळाडू होण्याचा मान पटकावला आहे.तसेच नोव्हाक जोकोविचने पाच सेटच्या कडव्या संघर्षानंतर यानिक सिनरची झुंज मोडली आणि आपल्या रौप्य महोत्सवी ग्रॅण्डस्लॅमपूर्तीच्या दिशेने पुन्हा एकदा धाव घेतली. आता पुन्हा एकदा जेतेपदासाठी जोकोविच-अल्काराज संघर्ष पाहायला मिळणार आहे.

आज पहिल्या उपांत्य सामन्यात अल्काराजला पायाचे स्नायू ताणल्याचा त्रास सहन करावा लागला. गेल्या वर्षीचा उपविजेता झ्वेरेवने त्याला कडवी झुंज दिली. मात्र अखेर तब्बल पाच तास 27 मिनिटे चाललेल्या या लढतीत अल्काराजने 6-4, 7-6 (5), 6-7 (3), 6-7 (4), 7-5 असा थरारक विजय मिळवला.

अल्काराजने सामन्याची सुरुवात दमदार केली आणि पहिले दोन सेट आपल्या नावे केले. मात्र त्यानंतर सलग दोन सेट टायब्रेकमध्ये गमावत सामना निर्णायक वळणावर आणून ठेवला. झ्वेरेव पाचव्या सेटमध्ये एकदा सामन्यासाठी सर्व्हिसही करत होता, पण अल्काराजने ब्रेक पॉइंट मिळवत शानदार पुनरागमन केले आणि त्यानंतर जर्मन खेळाडूला कोणतीही संधी दिली नाही.

जोको स्वप्नपूर्तीच्या दिशेने

नोवाक जोकोविचने आपल्या सुवर्णकाळातील वेगवान खेळाची झलक दाखवत पाच सेट्सच्या क्लासिक थरारात यानिक सिनरचा पराभव केला आणि व्यावसायिक टेनिस युगात ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचणारा सर्वात वयोवृद्ध पुरुष खेळाडू होण्याचा मान मिळवला. प्रचंड जल्लोषात न्हालेल्या रॉड लेव्हर अरेनात जोकोविचने अनुभव, संयम आणि जिद्दीच्या जोरावर इतिहास घडवला.

39 व्या वाढदिवसाला अवघे चार महिने शिल्लक असताना जोकोविचने पुन्हा एकदा सिद्ध केले की, तो आजही अपराजित आहे. सलग दोन वेळचा विजेता असलेल्या सिनरला त्याने 3-6, 6-3, 4-6, 6-4, 6-4 असा पराभव स्वीकारायला लावला. हा सामना शनिवारी पहाटेपर्यंत रंगला होता.