
लालबाग-परळची ओळख केवळ गिरणगाव, सण-उत्सव आणि संस्कृतीपुरती मर्यादित न ठेवता मराठी मातीतल्या खेळांचा दमदार आवाज पुन्हा घुमवण्यासाठी शिवसेना नगरसेवक किरण तावडे यांनी जोरदार पाऊल उचलले आहे. पुनर्बांधणी सुरू असलेल्या साईबाबा पथ महापालिका शाळेच्या आवारात कबड्डी व खो-खोसाठी स्वतंत्र जागा राखीव ठेवावी, अशी मागणी त्यांनी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडे केली आहे.
लालबाग-परळ परिसरात झपाटय़ाने उभ्या राहत असलेल्या उंचच उंच इमारतींमुळे मैदाने हळूहळू नामशेष होत असल्याचे चित्र आहे. ‘टॉवर संस्कृती’ वाढताना खेळांसाठी मोकळी जागा कमी होत चालली असून याचा थेट फटका भावी पिढीच्या शारीरिक व क्रीडा विकासाला बसत आहे. याच पार्श्वभूमीवर लालबाग-परळची क्रीडा परंपरा जपण्यासाठी किरण तावडे यांनी पुढाकार घेतला आहे.
कबड्डी आणि खो-खोसारख्या मराठी मातीशी नाळ जोडलेल्या खेळांनी लालबाग-परळला आजवर असंख्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू दिले आहेत. ही सुवर्णपरंपरा पुढेही अखंड सुरू राहावी यासाठी या खेळांना हक्काची मैदाने मिळणे अत्यावश्यक असल्याचे मत तावडे यांनी व्यक्त केले आहे. खो-खो व कबड्डीवरील प्रेमातून आतापर्यंत अनेक स्पर्धांचे यशस्वी आयोजन करणाऱ्या तावडेंनी यासंदर्भात महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या उपायुक्त डॉ. प्राची जांभेकर यांना निवेदन दिले आहे.






























































