
एल्फिन्स्टन पुलामुळे बाधित होणाऱया हाजी नुरानी आणि लक्ष्मी निवास या दोन इमारतींमधील रहिवाशांना लवकरच नव्या घराच्या चाव्या मिळणार आहेत. म्हाडाने शुक्रवारी 78 घरे एमएमआरडीएकडे सुपूर्द केली आहेत. आता रहिवाशांना घरांचे वाटप करण्याची जबाबदारी एमएमआरडीएवर असणार आहे.
वरळी-शिवडी कनेक्टरसाठी एल्फिन्स्टन पूल पाडून त्याजागी डबल डेकर पूल उभारला जाणार आहे. या पुलाच्या कामामुळे येथील हाजी नुरानी आणि लक्ष्मी निवास या दोन इमारती बाधित होणार आहेत. आमचे याच परिसरात पुनर्वसन करा, अशी रहिवाशांची आग्रही मागणी होती. संबंधित रहिवाशांना दादर, माहीम, माटुंगा, वडाळा, प्रभादेवी, लोअर परळ या भागातील म्हाडाची घरे मालकी तत्त्वावर दिली जाणार आहेत. त्यानुसार एमएमआरडीएने म्हाडाकडे 78 घरांची मागणी केली होती. या घरांपोटी 90 कोटी रुपये नववर्षाच्या सुरुवातीलाच म्हाडाच्या तिजोरीत जमा केले आहेत. अखेर शुक्रवारी म्हाडाने ही घरे एमएमआरडीएकडे सुपूर्द केली आहेत.
दुरुस्तीचे पावणेदोन कोटी रुपये द्या
म्हाडाची 78 घरे तीन ते चार वर्षे धूळ खात पडली होती. या घरांची दुरुस्ती म्हाडाने केली आहे. शिवाय पूलबाधित राहत असलेल्या हाजी नुरानी आणि लक्ष्मी निवास या उपकरप्राप्त इमारतींच्या दुरुस्तीवरदेखील म्हाडाने खर्च केला होता. त्यामुळे दुरुस्तीवर खर्च केलेले पावणेदोन कोटी रुपये द्यावे, अशी मागणीदेखील म्हाडाकडून एमएमआरडीएकडे करण्यात आली आहे.
























































