
रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाने उमेदवारी देताना घराणेशाहीला प्राधान्य दिले आहे. अनेक ठिकाणी नेत्यांनी पत्नी, सुना आणि मुलांनाच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक रिंगणात उतरवल्यामुळे कार्यकर्त्यांच्या हाती फक्त सतरंज्या उरल्या आहेत. घराणेशाहीमुळे या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची लाट उसळली आहे.
जिल्हा परिषदेच्या 59 जागांसाठी तर 15 पंचायत समितीच्या 118 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्हा परिषदेसाठी व पंचायत समितीसाठी 502 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अलिबागमधून शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी पत्नी मानसी दळवी आणि सून आदिती दळवी यांना निवडणुकीत उतरवले आहे. माजी आमदार सुभाष पाटील यांच्या पत्नी भावना पाटील व मुलगा सुप्रभात पाटील हे भाजपकडून उमेदवार आहेत. पाटील कुटुंबातील चित्रा पाटील भाजपचे उमेदवार आहेत. महाडमध्ये शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले निवडणूक लढवत आहेत. कर्जतचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचे पुतणे प्रसाद थोरवे हे शिंदे गटाचे उमेदवार आहेत. पेणमध्ये आमदार रवींद्र पाटील यांचे चिरंजीव वैकुंठ पाटील, खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी नीलिमा पाटील यादेखील निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना नातीगोती जपल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
























































