
कधी पेंटाग्राफ तुटला.. तर कधी सिग्नल बिघाड.. काही वेळा रुळावरून घसरलेल्या मालगाड्या यामुळे नेहमीच ‘मरे’ची वाहतूक खोळंबते. मात्र याबाबत अनेकदा आवाज उठवूनही प्रशासन कानाडोळा करत असल्याने रेल्वे प्रवासी संघटनेने वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. प्रवाशांच्या संतापानंतर ताळ्यावर आलेल्या अधिकाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने सर्व प्रश्न तडीस लावण्याचे आश्वासन दिले.
वर्षानुवर्षे रखडलेले प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यामुळे रेल्वे वाहतूक व्यवस्थेवर ताण येत असून त्याचा नाहक फटका प्रवाशांना बसत आहे. मेल एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्य देत लोकल गाड्या सुरळीत आणि वेळेत चाल विण्यावर भर देण्यात यावा. तसेच प्लॅटफॉर्म व्यवस्थापन, सिग्नल यंत्रणा, वेळापत्रकातील समन्वय आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने पुढाकार घेत प्रवाशांच्या लवकरात लवकर समस्या सोडवाव्यात अशी मागणी केली.
… तर गर्दी कमी होईल
2010 पासून कसारा मार्गावर एकही लोकल ट्रेन वाढविली नाही. तसेच ठाणे किंवा कल्याण येथून कसारासाठी लोकल ट्रेन वाढविणे शक्य नसेल तर टिटवाळा ते कसारा लोकल ट्रेन सुरू करा अशी मागणी करण्यात आली. कोरोना कालावधीत बंद केलेल्या मेल एक्सप्रेसला कसारा येथे अधिकृत थांबा दिल्यास रोजच्या गर्दीतील दहा टक्के गर्दी कमी होईल.
रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या आहेत. टप्प्याटप्याने सुधारणा करण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहे. या समस्यांचे निराकरण होईल ही अपेक्षा आहे.
राजेश घनघाव, अध्यक्ष – रेल्वे प्रवासी संघटना
























































