
रस्ता ओलांडताना मदतीच्या बहाण्याने चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तब्बल १६०० सीसीटीव्ही कॅमेरे खंगाळून, ५४६ किलोमीटरचा प्रवास करून अवघ्या सहा दिवसांत पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. मुंब्रा पोलीस ठाण्याच्या चार पथकांनी ही दमदार कामगिरी बजावली असून अपहरण झालेल्या तीन महिन्यांच्या छकुलीला आईच्या स्वाधीन केले. डोळ्यांसमोर अपहरण झालेली चिमुकली पुन्हा कुशीत विसावताच आईच्या डांळ्यांत आनंदाश्रू तरळले. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
मुंब्रा-कौसा येथील खाडी मशीन परिसरातील अजमेरी हाईट्स येथे राहणारी फरजाना मान्सून (२३) ही महिला २२ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता दोन मुलींना घेऊन डीसीबी बँकेसमोरील रस्ता ओलांडत होती. ३ महिन्यांची छकुली अफिया ही तिच्या कडेवर होती आणि मोठी मुलगी अनाबिया ही रडत होती. त्यावेळी तिच्या शेजारी उभी असलेली अनोळखी महिला मदत करण्याच्या बहाण्याने तिच्या जवळ आली. ‘छोटी बच्ची को मेरी गोद मे देदो, मैं भी सामने ही जा रही हूं’ असे सांगत चिमुकलीला हातात घेतले आणि पोबारा केला.
तक्रार मिळताच मुंब्रा पोलिसांनी मुंब्यासह ठाणे ते मुंबई व वांगणीपर्यंत सर्व रेल्वे स्थानके व आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. या शोधमोहिमेत अपहरणकर्ती महिला पोलिसांना गुंगारा देण्यासाठी वेशांतर करून व मुलीच्या अंगावर गुंडाळलेला कपडा बदलून पुन्हा मुंब्रा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवर आली व तिने तेथे तिची वाट पाहत उभ्या असलेल्या जोडप्याच्या हातात बाळाला दिल्याचे दिसले. त्यानंतर ते दोघेही सीएसएमटी लोकलमध्ये चढले आणि बेपत्ता झाले.
.. आणि आकोल्यात सापडली
पथकाला गुंगारा देणाऱ्या महिलेचा मुंब्रा पोलिसांनी पुन्हा शोध सुरू केला. गुप्त बातमीदार व तांत्रिक यंत्रणांच्या मदतीने तपास करत पोलिसांनी इन्शानगर येथून नसरीन शेख हिला ताब्यात घेतले. पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली देत बाळ अकोल्यातील पातूर येथील खेटरी गावात असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने मोहम्मद मुजीब गुलाब व खैरुनिसा मुजीब मोहम्मद या दाम्पत्याच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी छकुलीला ताब्यात घेऊन आईच्या कुशीत परत दिल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्त अशुतोष डुंबरे यांनी दिली.
या पथकाची कारवाई
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक नितीन पगार, शरद कुंभार, तेजस सावंत, गुन्हे शोध पथकाचे सपोनी सावंत, विनायक माने, रवींद्र पाखरे, सूरज पाटील, सतीश खाबडे, संदीप थोरात, अंकुश शिंदे, अजित तडवी, कृष्णा आव्हाड, मच्छिंद्र विरकर, अजिंक्य महाडिक, नितीन पाटोळे, दुर्वा देसाई या पथकाने शिताफीने तपास केला.






























































