ठाणे, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, वसई-विरार महापौर, उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल; 3 फेब्रुवारीला होणार निवड

बातमी शेर करा :
सामना फॉलो करा

कल्याण-डोंबिवली, ठाणे, वसई-विरार, मीरा-भाईंदर, उल्हासनगर महापालिकांच्या महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक ३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यासाठी आज अर्ज दाखल करण्यात आले. महापौर, उपमहापौर निवड गुप्त मतदानाऐवजी हात वर करून होणार आहेत. सभागृहात बहुमत कुणाकडे आहे याची मोजणी करून महापौर-उपमहापौर निवडीची घोषणा केली जाणार आहे. यासाठी कोकण आयुक्तांनी नियुक्त केलेले प्रशासकीय अधिकारी हे पीठासीन अधिकारी म्हणून निवडीची प्रक्रिया पार पाडणार आहे.

ठाण्यात शिंदे गटाचा सवा वर्ष महापौर

ठाणे – महापालिकेत महापौर तसेच उपमहापौरपद हे पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार अडीच वर्षे दिले जात होते. गेले अनेक वर्षे हाच फॉर्म्युला असताना यंदा मात्र ही परंपरा मोडीत काढून सवा-सवा वर्षे असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार ठाण्यात शिंदे गटाचा सवा वर्षाचा महापौर तर भाजपचादेखील सवा वर्षाचा उपमहापौर होणार आहे. महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड तर उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील यांची आज बिनविरोध निवड झाली आहे.

ठाण्याच्या महापौरपदासाठी कमालीची चुरस निर्माण झाली होती. महापौरपदासाठी अनेक नावांची चर्चा पालिका वर्तुळात सुरू होती. आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दिवशी या पदासाठी कोण अर्ज दाखल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, कोपरीमधील नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड तर उपमहापौरपदासाठी भाजपच्या कृष्णा पाटील यांनीच आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. त्यामुळे दोघांची वर्णी लागली असून येत्या ३ फेब्रुवारी रोजी या दोन्ही पदांची केवळ औपचारिक घोषणा होणार आहे. तर विरोधात बसण्याची भूमिका घेणाऱ्या भाजपने आपला निर्णय बासनात गुंडाळला.

अश्विनी निकम यांचा महापौरपदासाठी अर्ज

उल्हासनगर – उल्हासनगर पालिकेच्या निवडणुकीत ७८ पैकी ४० जागांवर शिंदे गटाने तर ३७ जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. आज महापौरपदासाठी शिंदे गटाच्या अश्विनी निकम यांनी तर भाजपचे अमर लुंड यांनी उपमहापौरपदासाठी आज अर्ज दाखल केले. अन्य अर्ज दाखल न झाल्याने बिनविरोध निवडीची औपचारिकता राहिली आहे. ३ फेब्रुवारी रोजी महापौर, उपमहापौर निवडीची घोषणा होईल, अशी माहिती पालिका सचिव अनंत जवादवार यांनी दिली. रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या देखरेखीखाली आणि आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या उपस्थितीत पालिका सभागृहात विशेष महासभेचे यासाठी आयोजन करण्यात आले आहे.

केडीएमसी महापौरपदासाठी अॅड. हर्षाली थवील यांचा एकमेव अर्ज

डोंबिवली – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडून एकूण १२२ नगरसेवक निवडून आले। आहेत. महापौर निवडीसाठी शिंदे गट, भाजप व मनसेची महायुती झाली आहे. या महायुतीकडून महापौरपदासाठी शिंदे गटाच्या नगरसेविका अॅड. हर्षाली थवील-चौधरी तर उपमहापौरपदासाठी भाजपचे राहुल दामले यांनी पालिका सचिव किशोर शेळके यांच्याकडे अर्ज सादर केले. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौरपद यंदा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी राखीव आहे. आज महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने ३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेतील निवडणूक प्रक्रिया केवळ औपचारिकता ठरणार आहे. मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली ही महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक पार पडणार आहे.

मीरा-भाईंदरमध्ये काँग्रेस-शिंदे गटाची युती

भाईंदर – मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत ९५ पैकी भाजपचे ७८ नगरसेवक निवडून आले आहेत तर काँग्रेसचे १३ आणि महानगरपालिका शिंदे गटाचे तीन तर अपक्ष १ नगरसेवक निवडून आला आहे. आज भाजपच्या डिंपल मेहता यांनी महापौरपदासाठी तर ध्रुव पाटील यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे राज्यात भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिंदे गटाने पालकेच्या राजकारणात काँग्रेससोबत युती केली आहे. काँग्रेस आणि शिंदे गटाने एकत्र मीरा – भाईंदर विकास आघाडी स्थापन केली असून काँग्रेसच्या रुबिना शेख यांनी महापौरपदासाठी तर शिंदे गटाच्या वंदना पाटील यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला.

वसईत महापौर, उपमहापौरपदासाठी दुरंगी लढत

वसई – वसई-विरार महापालिका निवडणुकीनंतर आज महापौर आणि उपमहापौरपदासाठी बहुजन विकास आघाडी आणि भाजप अशा दोन्ही पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याने दुरंगी लढत होणार आहे. वसई-विरार महापालिकेची तिसरी पंचवार्षिक निवडणूक अत्यंत चुरशीने झाली. मात्र ११५ पैकी बहुजन विकास आघाडीने ७० जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. भाजपने ४३, काँग्रेस १ व शिंदे गट १ असे नगरसेवक निवडून आले आहेत. बहुजन विकास आघाडीकडून महापौरपदासाठी अजीव पाटील आणि प्रफुल्ल साने यांनी तर भाजपकडून महापौरपदासाठी दर्शना त्रिपाठी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर उपमहापौरपदासाठी बविआकडून मार्शल लोपीस, कन्हैया भोईर तर भाजपकडून नारायण मांजरेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.