
नागमोडी वळणे.. तीव्र उतार आणि अरुंद रस्ता ही मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील प्रसिद्ध मेंढवण खिंडीची ओळख. या खिंडीतून गाड्या चालविणे म्हणजे वाहनचालकांच्या दृष्टीने मोठे दिव्यच असते. आतापर्यंत या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. असे असतानाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गाड्यांचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतल्याने जणू मृत्यूला निमंत्रण दिले आहे. हलक्या वाहनांसाठी ताशी १०० किलोमीटर, तर जड वाहनांकरिता प्रति तास ८० किलोमीटर एवढी वेगमर्यादा निश्चित केल्याने भविष्यात मेंढवण खिंडीमध्ये मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या व्हाईट टॉपिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर विविध सूचना फलक, दिशादर्शक फलक, वेगमर्यादा आणि सुरक्षा रेलिंग बसवण्याचे काम सुरू आहे. मात्र याच दरम्यान घाटरस्त्यावर वेगमर्यादा वाढवणारे फलक लावण्यात आल्याने महामार्ग प्राधिकरणाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता वेग वाढविल्याने घाटामध्ये अपघात होणार असून घाटात वेग वाढवा.. अपघातांना मोकळे रान द्या.. असा संदेशच जणूकाही प्राधिकरणाने दिला आहे काय, असा संतप्त सवाल प्रवाशांनी केला आहे.
- मनोर गेट हॉटेलपासून मेंढवण गावापर्यंतचा घाटरस्ता हा कायमच धोकादायक मानला जातो. या खिंडीत नागमोडी वळणे, तीव्र उतार आणि अरुंद रस्ता असल्याने यापूर्वी अनेक भीषण अपघात घडले आहेत.
- गेल्या वर्षभरात मेंढवण खिंडीत ४५ अपघात झाले असून ४९ जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे मेंढवण खिंड ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे.
- अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असताना रस्त्याची दुरवस्था, अपुरा प्रकाश, धोक्याची पूर्वसूचना देणाऱ्या फलकांचा अभाव दिसून येतो.
ब्लॅक स्पॉट आणि घाटरस्त्यांवरील अपघात रोखण्यासाठी वेगमर्यादा कमी करण्याच्या सूचना महामार्ग प्राधिकरण व ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. मेंढवण खिंड, वरई उड्डाणपूल आदी भागात वेगमर्यादा कमी करणे अत्यावश्यक आहे.
– पवन ठाकूर (सहाय्यक पोलीस निरीक्षक, महामार्ग सुरक्षा विभाग, दुर्वेस दूरक्षेत्र)
























































