
पर्यावरणाची किडनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदळवनाचे संवर्धन करण्यासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. डहाणू व तलासरी तालुक्यातील सुमारे ४९४ हेक्टर कांदळवन क्षेत्राला राखीव दर्जा देण्यात आला आहे. वाढवण, देताळे, चिंचणी, वळदे, नरपड, आंबेवाडी, चिखले, घोलवड, बोर्डी, चंडीगाव आणि कोलवली या किनारी भागातील कांदळवनाला संरक्षित वनाचा दर्जा मिळाल्यामुळे पर्यावरणाची किडनी वाचणार आहे.
किनारपट्टीचे नैसर्गिक रक्षण करणारे आणि पर्यावरणाचा समतोल टिकवून ठेवणारे कांदळवन सध्या विविध विकासकामे, अतिक्रमण आणि मानवी हस्तक्षेपामुळे धोक्यात आले असून त्याच्या संरक्षणाची गरज अधिक तीव्रतेने जाणवत आहे. कांदळवनांना ‘कार्बन सिंक’ म्हणून ओळखले जाते. वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेण्याची त्यांची क्षमता जास्त असल्याने हवामान बदलाच्या पाश्र्वभूमीवर कांदळवने पर्यावरणासाठी संरक्षक भिंत ठरतात. महाराष्ट्र शासनाने कांदळवनांचे संरक्षण, पुनर्लागवड आणि संवर्धनासाठी विविध उपक्रम हाती घेण्याची आवश्यकता असल्याचे मत स्थानिक पर्यावरण अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे. त्यानुसार प्रशासनाने डहाणू आणि तलासरी तालुक्यातील कांदळवनाला संरक्षित वनाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.
- कांदळवन मुळांमुळे समुद्राच्या लाटांचा वेग कमी होतो आणि जमिनीची धूप रोखली जाते. सध्या डहाणू समुद्रकिनाऱ्यालगत चंद्रनगर खाडी, चिखले व नरपड परिसरात वाढती धूप दिसून येत आहे. ही धूप थांबवण्यासाठी कांदळवनांचे जतन करणे आवश्यक आहे.
- पर्यावरणीय फायद्यांसोबतच कांदळवन पर्यटनाची संधीदेखील निर्माण करू शकते. योग्य नियोजन केल्यास स्थानिकांना रोजगारनिर्मितीची साधने उपलब्ध होऊ शकतात.
कांदळवनाचे जतन करण्याची गरज
कांदळवन म्हणजे पर्यावरणाची ‘किडनी’ आहे. जसे आपल्या शरीरात किडनी रक्त शुद्ध करते, तसेच कांदळवन प्रदूषण शोषून पर्यावरण शुद्ध ठेवते. त्यामुळे विकास प्रकल्पांच्या युगात कांदळवन जपणे अत्यंत गरजेचे असून शासनाने मोठ्या प्रमाणात संरक्षण व संवर्धनाचे प्रयत्न करावेत, अशी प्रतिक्रिया कांदळवन अभ्यासक जयंत ओंढे यांनी व्यक्त केली आहे.
























































