
राज्यात उपमुख्यमंत्रीपदाच्या चर्चा सुरू आहेत. यात दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव घेण्यात येत आहे. याबाबत अंतिम निर्णय अमित शहा घेणार आहेत, कदाचित त्यांनी निर्णय घेतला असेल, अमिश शहा, देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय आणि भाजपची भूमिका यावरूनच मिंधे आणि अजित पवार गटाचे भविष्य ठरणार आहे. अजित पवार यांच्या दुखवट्याच्या काळात अशा राजकीय चर्चा करणे अयोग्य असून भाजप हा मढ्यच्या टाळूवरचे लोणी खाणारा पक्ष आहे, अशा शब्दांत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार असल्याच्या बातम्या येत आहेत. दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांचे नाव उपमुख्यमंत्रीपदासाठी घेतले जात आहे. मात्र, याबाबत आपल्याला काही माहिती नाही. आता हे त्यांचे राजकारण आहे, त्यांच्या पक्षाचा विषय आहे. त्यामुळे त्याबाबत जास्त बोलणे योग्य नाही. अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यातून अजूनही महाराष्ट्र सावरलेला नाही. अशा परिस्थितीत अजित पवार यांच्या कुटुंबातील कोणी भाजपच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री होणार असेल तर हा त्यांच्या पक्षाचा आणि त्यांच्या कुटुंबाचा कौटुंबिक विषय आहे. याबाबत कोणीही मतं व्यक्त करण्याची ही वेळ नाही, असे संजय राऊत म्हणाले.
त्यांच्या पक्षात अनेक नेते आहेत. त्यांच्या पक्षात नेत्यांची मोठी फळी आहे. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यासारख्या राष्ट्रीय नेत्यांच्या त्यांच्या पक्षात फळी आहे. आता या राष्ट्रीय नेत्यांनी हा निर्णय घेतला असेल तर तो त्याच्या निर्णय आहे. त्यांचा पक्ष सत्तेत सहभागी होता. तसेही शेवटी हा निर्णय अमित शहा घेणार आहेत, त्यांनी तो निर्णय घेतला असेल, असे ते म्हणाले.
अजित पवार यांचा स्वतंत्र गट आहे. त्यामुळे त्या गटाच्या निर्णयाबाबत कोणालाच माहिती नाही. शरद पवार जे सांगत आहेत, ते योग्य आहे, याबाबत कोणालाही माहिती नाही. हा त्यांच्या गटतील निर्णय आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचे जे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांनी फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली आणि हा निर्णय घेतला असेल, असे ते म्हणाले. अजित पवार यांच्या दुखवटा संपत नाही, तोपर्यंत आम्ही या राजकीय विषयावर बोलणार नाही. यावर बोलण्यासारखे खूप आहे. मात्र, आम्ही बोलणार नाही. भाजप हा मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारा पक्ष आहे. भाजपला दुःख, दुखवटा याच्याशी काहीही संबंध नाही. मात्र, ही वेळ त्यावर बोलण्याची नाही. अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू होती. अजित पवार असताना हे शक्य होते, असे शरद पवार यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. आता त्यांच्या बैठका होतील आणि ते काय तो निर्णय घेतील. याबाबत आपण बोलू, मात्र, आता ते बोलण्याची वेळ नाही, असे त्यांनी स्पष्ट केले
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर आता शिवसेना नेतृत्वहीन झाली, असे समजून शिवसेना पक्ष गिळण्याची भाजपची मोठी इच्छा होती. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची योजना उधळून लावली, याचा रागही त्यांच्या मनात आहे. मिंधे गट आणि अजित पवार गट ही भाजपच्याच गर्भातून आलेली पिल्ले आहेत. हे अमित शहा यांचे गट आहेत. राज्यातील प्रमुख घराणी, राज्यासाठी काम करणारे पक्ष फोडले, असे असून या निर्णयाशी आमचा संबंध नाही, अजित पवार यांचा पक्ष जो निर्णय घेईल, तो मान्य असेल, असे भाजपने म्हणणे म्हणजे राज्यातील जनतेला मूर्ख समजण्यासारखे आहे. अमित शहा, फडणवीस याबाबतचा निर्णय घेईल, त्यांच्या भूमिकेनुसार मिंधे आणि अजित पवार गटाचे भविष्य ठरेल. याबाबत अमित शहा, फडणवीस यांची महत्त्वाची भूमिका असेल, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची त्यात काहीही भूमिका नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.






























































