
रुचकर आणि औषधी गुणधर्मांमुळे प्रसिद्ध असलेल्या अलिबाग कांद्याची यंदा बाजारात आस्ते कदम एण्ट्री होणार आहे. पावसाने मुक्काम वाढवल्यामुळे शेतकऱ्यांचे वेळापत्रकच कोसळले असून माळी तयार करणे, वाळवण, प्रतवारी ही कामे उशिरा होत आहेत. प्रत्यक्षात कांदा मार्केटमध्ये येण्यासाठी खवय्यांना आणखी 15 दिवसांची वाट बघावी लागणार आहे. अंदाजे फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत हा कांदा येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळा तसेच आसपासच्या परिसरात पांढऱ्या कांद्याची कामे उशिराने सुरू असल्याचे दिसून येत आहे.
वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे पांढऱ्या कांद्याला सर्वत्र मोठी मागणी असते. दरवर्षी अंदाजे पाच हजार टन एवढे उत्पादन होते. कार्ले, खंडाळा, वाडगाव या भागामध्ये पांढऱ्या कांद्याची शेती स्थानिक शेतकरी करतात. मात्र यंदा पावसाने अपेक्षेपेक्षा जास्त काळ मुक्काम केल्याने शेतीच्या सर्वच कामांवर परिणाम झाला. विशेषतः खरीप हंगामातील कापणी उशिरा झाल्याने कांदा लागवडीचा नियोजित कालावधी पुढे ढकलावा लागला.
गुजरातची ‘घुसखोरी’
पर्यटनासाठी अलिबागमध्ये येणाऱ्या ग्राहकांना पांढऱ्या कांद्याचे मोठे आकर्षण असते. अनेक जण घरी जाताना हा कांदा सोबत नेतात. मात्र यंदा वडखळच्या बाजारपेठेत गुजरातच्या पांढऱ्या कांद्याने घुसखोरी केली आहे. दुकानदारदेखील गुजरातचा कांदा हा अलिबागचा सांगून विकत असल्याने ग्राहकांची सपशेल फसवणूक केली जात आहे.
– खरीप पिकांची कापणी पूर्ण झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांत कांदा लागवड केली जाते. दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणारी कांदा लागवड यंदा 316 हेक्टर क्षेत्रात नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात करावी लागली.
– कांद्याची लागवड सुमारे 15 दिवस उशिरा झाली. या विलंबाचा थेट परिणाम कांद्याच्या वाढीवर तसेच काढणीच्या वेळापत्रकावर झाला आहे. काढणीनंतर कांद्याच्या माळी तयार करणे, वाळवण, प्रतवारी तसेच बाजारात पाठविण्याची प्रक्रिया केली जाते.
– पाऊस उशिरापर्यंत सुरू राहिल्याने यंदा पांढऱ्या कांद्याचे पीक हाती येण्यासाठी काही दिवसांचा विलंब होत आहे. जानेवारीच्या अखेरीस काढणी सुरू झाली तरी प्रत्यक्षात हा पांढरा कांदा फेब्रुवारी महिन्यातच बाजारात उपलब्ध होईल.
























































