अजित पवारांच्या संमतीने 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, जयंत पाटील यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी दिवंगत अजित पवार यांच्या भूमिकेबाबत सविस्तर माहिती दिली. दादांच्या अपघाती निधनाच्या दिवशी संध्याकाळीच आपण प्रतिक्रिया देताना हे सर्व सांगितले होते, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

जयंत पाटील म्हणाले की, अलीकडच्या काळात अजित पवार अनेक वेळा स्वतः त्यांच्या घरी आले होते. जवळपास चार वेळा ते संध्याकाळी जेवणासाठी येत असत आणि जेवणानंतर सविस्तर राजकीय चर्चा होत असे. त्या चर्चांमधून दादांची एकच ठाम भूमिका होती— राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र यावेत आणि तेही शरद पवार यांच्या उपस्थितीत.

“माझ्याबद्दल जनमानसात निर्माण झालेलं सगळं गैरसमज पुसून टाकून, मी पुन्हा साहेबांच्या बरोबर, त्यांच्या पक्षाबरोबर यायला तयार आहे,” असे अजित पवार वारंवार सांगत असत, असे जयंत पाटील यांनी नमूद केले. साहेबांबद्दल त्यांचा प्रचंड आदर होता आणि मागील दोन-अडीच वर्षांचा कालखंड मागे टाकून महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकसंध करायची, ही त्यांची अंतिम आणि अत्यंत तीव्र इच्छा होती.

या संदर्भात जवळपास 8 ते 10 बैठका जयंत पाटील यांच्या घरीच झाल्या. पहिल्या काही बैठका तर अजित पवारांच्या भावना व्यक्त करण्यातच गेल्या, असेही त्यांनी सांगितले. या चर्चांमध्ये काही वेळा सुप्रिया सुळे यांनाही उपस्थित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

16 तारखेला रात्री जयंत पाटील यांच्या घरी पक्षातील काही प्रमुख नेते आणि अजित पवार यांची महत्त्वाची बैठक झाली. त्याआधी अमोल कोल्हे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यासह पक्षाध्यक्षांसोबत दोन वेळा चर्चा झाली होती. त्या बैठकीत जिल्हा परिषद निवडणुका आघाडीत लढवण्याचा निर्णय झाला आणि निकालानंतर एकत्र येण्याबाबत अंतिम निर्णय घ्यायचा, असे ठरले.

जिल्हा परिषदेचे निकाल साधारणपणे 7 तारखेला लागतील, असे गृहीत धरून 12 तारीख निश्चित करण्यात आली. त्याआधी जयंत पाटील दिल्लीला एका लग्नानिमित्त जाणार असल्याने 8–9 तारखा टाळण्यात आल्या. मधल्या काही दिवसांत आवश्यक औपचारिकता पूर्ण करायची होती.

यानंतर पहाटे अचानक निर्णय घेऊन सर्वजण पवार साहेबांना भेटण्यासाठी बारामतीला जाण्याचे ठरले. विमानाने जाण्याचा विचार होता, मात्र धावपट्टी लहान असल्याने तो पर्याय बाद झाला. अखेर पहाटे गाडीने निघून सकाळी 8 वाजता पवार साहेबांसमोर सर्वजण बसले. तेथे सविस्तर चर्चा झाली आणि 12 तारखेवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.

जयंत पाटील यांनी पुढे सांगितले की, अजित पवारांनी या निर्णयाची माहिती प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ तसेच त्यांच्या पक्षातील अन्य आमदारांनाही दिली होती. “मी जेव्हा निर्णय सांगतो, तेव्हा तो निर्णय अमलात येतो. माझे सर्व सहकारी माझ्या शब्दाप्रमाणेच निर्णय करतील,” असे अजित पवार ठामपणे सांगत असत, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रक्रियेचे अनेक तपशील असून योग्य वेळी त्याचा सविस्तर खुलासा केला जाईल, असेही जयंत पाटील यांनी शेवटी नमूद केले.