ICC T20 WC 2026 – ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; पॅट कमिन्ससह प्रमुख बॅटर संघातून बाहेर, वर्ल्डकप संघात ऐनवेळी दोन बदल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीसी टी-20 वर्ल्डकपला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. हिंदुस्थान आणि श्रीलंकेमध्ये क्रिकेटचा हा महासंग्राम रंगणार आहे. वर्ल्डकप सुरू होण्यास अवघ्या आठवड्याचा कालावधी शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे वर्ल्डकपला मुकणार आहे. त्याच्यासह आघाडीचा बॅटर मॅथ्यू शॉर्टही ही स्पर्धा खेळू शकणार नाही. त्यामुळे ऐनवेळी ऑस्ट्रेलियाच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत.

पॅट कमिन्स बऱ्याच काळापासून पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. या दुखापतीतून तो अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे आगामी टी-20 वर्ल्डकपला तो मुकणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त आघाडीचा बॅटर मॅथ्यू शॉर्ट यालाही अंतिम 15 खेळाडूंमध्ये स्थान मिळालेले नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शनिवारी याबाबत माहिती दिली.

पॅट कमिन्सच्या जागी वेगवान गोलंदाज बेन ड्वारशुइस आणि मॅथ्यू शॉर्टच्या जागी मॅथ्यू रेनशॉ याचा ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. हे दोन्ही खेळाडू वर्ल्डकपमध्ये महत्त्वाची भूमिका निभावतील असे निवड समितीचे अध्यक्ष टोनी डोडेमेड यांनी सांगितले.

टोनी डोडेमेड यांनी म्हटले की, पॅट कमिन्स याला पाठीच्या दुखापतीतून सावरण्यास आणखी अवधी हवा आहे. त्याच्या जागी बेन ड्वारशुइस हा सर्वोत्तम पर्याय आहे. तो डाव्या हाताने गोलंदाजी करतो. क्षेत्ररक्षणातही तो उजवा असून तळाला येऊन चांगली फलंदाजीही करतो. त्याच्या चेंडू स्विंग करण्याची क्षमता असून वेग आणि व्हेरिएशन्समुळे हिंदुस्थान-श्रीलंकेतील वातावरण तो फायदेशीर ठरेल.

दुसरीकडे शॉर्टच्या जागी मॅथ्यू रेनशॉ याला संधी मिळाली आहे. त्याने क्रिकेटच्या सर्वच फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया, क्विन्सलँड बुल्स आणि ब्रिस्बेन हीटकडून खेळताना त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. फिरकीला अनुकूल असणाऱ्या खेळपट्ट्या पाहता मधल्या फळीत तो ऑस्ट्रेलियन संघाला मजबुती देईल, असे डोडेमेड म्हणाले.

ऑस्ट्रेलियाचा संघ –

मिचेल मार्श (कप्तान), जेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, टिम डेविड, बेन ड्वारशुइस, कॅमरन ग्रीन, नाथन एलिस, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, मैथ्यू कुह्नमॅन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू रेनशॉ, मार्कस स्टॉयनिस आणि एडम जाम्पा.