
बॉलीवूडची चुलबुली अभिनेत्री प्रीति झिंटा हिचा आज 51 वा वाढदिवस आहे. ‘दिल से’ या चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवले होते. त्यानंतर तिने ‘दिल चाहता है’, ‘कल हो ना हो’, ‘कोई मिल गया’, ‘वीर जारा’ आणि ‘कभी अलविदा ना कहना’ असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. वाढदिवसानिमित्त आज तिच्याबद्दल जाणून घेऊया…
प्रीति झिंटा हिचा जन्म 31 जानेवारी 1975 रोजी हिमाचलमधील राजपूत कुटुंबात झाला. तिचे वडील दुर्गानंद झिंटा हिंदुस्थानी लष्करात अधिकारी होती. प्रीति झिंटा 13 वर्षांची असताना तिच्या वडिलांचे एका कार अपघातात निधन झाले. याच कारमध्ये तिची आई नीलप्रभाही होती. सुदैवाने त्या कार अपघातातून बचावल्या, मात्र भीषण अपघातात त्यांच्या शरीरातील हाडांचा अक्षरश: चुरा झाला होता. जवळपास वर्षभर त्या बेड रेस्टवर होत्या.
वडील गेल्याचं वृत्तपत्रातून कळलं

आई-वडिलांचा अपघात झाला तेव्हा प्रीति झिंटा शाळेत होती. एके सकाळी शाळेतील नन तिला उठवायला आली आणि घेऊन रुग्णालयात पोहोचली. तिथे तिची आई स्ट्रेचरवर होती. त्यावेळी आईने प्रीतिला वडिलांबाबत काहीही सांगितले नाही. दुसऱ्या दिवशी ती शाळेत पोहोचली तेव्हा वृत्तपत्रात तिने वडिलांच्या अपघाती मृत्युची बातमी वाचली. यामुळे तिला धक्का बसला होता आणि जवळपास सहा महिने ती रडली नव्हती.
अंडरवर्ल्ड डॉन विरोधात दिलेली साक्ष

प्रीति झिंटा हिने 2003 मध्ये थेट अंडरवर्ल्ड डॉन विरोधात साक्ष दिली होती. ‘चोरी चोरी चुपके चुपके’ या चित्रपटाचे फायनान्सर भारत शाह यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकील यांच्याशी संबंध ठेवल्याचे आरोप झाले होते. या प्रकरणात त्यांना अटकही झाली होती. याच दरम्यान, प्रीतिला 50 लाखांच्या खंडणीची धमकी मिळाली. या प्रकरणात सलमान खान, शाहरूख खान यासारख्या बड्या स्टारलाही साक्षीदार बनवण्यात आले होते. इतर सर्वांनी माघे हटले, मात्र प्रीतिने अंडरवर्ल्ड डॉनविरोधात साक्ष दिली. त्यावेळी तिला दोन महिने सुरक्षा पुरविण्यात आली होती.
600 कोटींची ऑफर धुडकावलेली

प्रसिद्ध चित्रपट निर्माते कमाल अमरोही यांचा मुलगा शानदार अमरोहीने 2011 मध्ये आपली 600 कोटी रुपयांची संपत्ती प्रीति झिंटा हिच्या नावावर करण्याची घोषणा केली होती. ते प्रीतिला आपल्या मुलीप्रमाणे मानत होते. परंतु प्रीतिने आपल्याला कुणाच्याही संपत्तीची गरज नसल्याचे म्हणत ही ऑफर नम्रपणे नाकारली होती.
2016 मध्ये लग्न, सरोगसीद्वारे झाली आई

मोठा पडदा गाजवल्यानंतर प्रीति झिंटा हिने 2016 मध्ये अमेरिकन उद्योगपती जीन गुडइनफ यांच्याशी लग्न केले. आता हे दाम्पत्य लॉस एंजिलिसमध्ये राहते. 2021 मध्ये तिने सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला. चित्रपटांसह स्पोर्ट इंडस्ट्रीतही अॅक्टिव्ह असते. आयपीएलमध्ये ‘पंजाब किंग्स’ या संघाची मालकी तिच्याकडे आहे.



























































