
या वर्षात सोने-चांदी यांचे दर गगनाला भिडले होते. सोने-चांदी दररोज दरवाढीचे नवनवे उच्चांक गाठत होते. या वाढीमुळे अनेकांनी कोणताही विचार न करता मोठे पैसे सोने आणि चांदीत गुंतवले. त्यांना शुक्रवारी मोठा फटका बसला आहे. वायदे बाजार बंद होताना चांदीच्या किमती विक्रमी पातळीपासून 1 लाखा 28 हजार रुपयांनी घसरल्या आहेत. मात्र, ही घसरण म्हणजे क्रॅश नसून नफावसुलीमुळे झालेले करेक्शन आहे, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर आता चांदीतील बुल रन संपली असून चांदीच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता काही तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
चांदी शुक्रवारी त्याच्या विक्रमी उच्चांकावरून 1 लाख 28 हजार रुपयांनी घसरली. वायदा बाजार म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीच्या किमती शुक्रवारी 1 लाख 28 हजार रुपयांपेक्षा जास्त घसरल्या. गुरुवारी चांदीच्या किमती ४,२०,०४८ रुपये प्रति किलोग्रॅमच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या होत्या. शुक्रवारी ४,२०,०४८ रुपये प्रति किलोग्रॅमच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्यानंतर, शुक्रवारी किंमत २,९१,९२५ रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली. याचा अर्थ चांदीच्या किमती त्यांच्या विक्रमी उच्चांकावरून १,२८,१२३ रुपयांनी घसरल्या. वायदा बाजारात चांदीच्या किमतीत गेल्या जवळपास १५ वर्षांतील ही सर्वात मोठी घसरण आहे.
येत्या काही दिवसांत चांदीच्या किमतींमध्ये आणखी घसरण होऊ शकते, असे मत काही तज्ज्ञांनी वर्तवले आहे. गुरुवारी चांदीने ४.२० लाखांचा टप्पा ओलांडला, तेव्हा आता किमती 5 लाखांवर जाणार असे समजून अनेक गुंतवणूकदारांनी कोणताही विचार न करता चांदीत मोठी रक्कम गुतंवली आणि याच संधीचा फायदा घेत बाजारातील अनुभवी दिग्गजांनी नफावसुलीली सुरुवात केली. त्यामुळे चांदीत मोठी घसरण झाली. चांदीच्या किमतीत आणखी घसरण होऊ शकते. येत्या काही दिवसांत चांदीच्या किमती सध्याच्या पातळीपासून ₹४०,००० पर्यंत घसरू शकतात. याचा अर्थ चांदीच्या किमती २.५० लाखांपर्यंत पोहोचू शकतात, असे तज्ज्ञांनी सांगितले. डॉलर निर्देशांकातील वाढीचा फटका चांदीच्या किमतींना बसू शकतो, ज्यामुळे मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. तसेच फेड पॉलिसी रेटमध्ये कोणताही बदल झालेला नाही. फेडच्या पॉलिसी बैठकींमध्ये फेडचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी असे संकेत दिले की, अर्थव्यवस्था मजबूत आहे आणि रोजगार आणि महागाईचे धोके कमी आहेत. परिणामी, व्याजदरांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. येत्या काही दिवसांतही ही परिस्थिती अशीच राहण्याची अपेक्षा आहे.
या सर्व घडामोडींचा परिणाम चांदीवर झाला असून मोठी घसरण झाली आहे. मात्र, ही घसरण म्हणजे चांदीतील क्रॅश नाही हे फक्त नफावसुलीमुळे झालेले करेक्शन आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चांदीची जागतिक स्तरावरील मागणी अद्यापही कायम आहे. सोलर पॅनल, ईव्ही मटेरियल, बॅटरी या क्षेत्रात चांदीची मागणी वाढत आहे. तसेच जागतिक स्तरावरील मागणी बघता, त्यातुलनेत पुरवठा कमी आहे. त्यामुळे करेक्शनमध्ये होणारी घसरण आता पूर्ण झाली आहे आणि आगमी काळात चांदीमध्ये बुल रन कायम राहील, असे तज्ज्ञांनी सांगितले. तसेच या घसरणीनंतर अजूनही सोने आणि चांदी तेजीमध्येच आहे. दोन महिन्यात चांदीने अडीच लाखांची मोठी झेप घेतली आहे. त्या तुलनेत शुक्रवारी झालेली घसरण हे करेक्शनच दिसत आहे, त्यामुळे दीर्घ काळासाठी गुंतवणूक फायद्याचीच ठरत असल्याचे दिसून येते, असेही तज्ज्ञांनी सांगितले.
चांदीच्या घसरणीबाबत आणखी तेजी येण्याची किंवा चांदीच्या किमती आणखी घसरण्याबाबत तज्ज्ञांनी मते व्यक्त केली आहेत. मात्र, चांदीच्या किमती वाढणार की कमी होणार, हे येत्या काही समजणार आहे.

























































