शाळांमध्ये मिळणारे सॅनिटरी पॅड्स किती दर्जेदार? कसे तपासायचे? वाचा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सरकारी आणि खासगी शाळांमधील विद्यार्थिनींना मोफत बायोडिग्रेडेबल सॅनिटरी पॅड्स मिळतील याची खात्री करण्याचे निर्देश शुक्रवारी दिले. मासिक पाळीचे आरोग्य हा संविधानानुसार जीवनाचा मूलभूत अधिकार असल्याचे न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे. दरम्यान, शाळांमध्ये पुरवल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅड्सची गुणवत्ता आणि ते  ते पाहूया…

शाळेत जाणाऱ्या मुलींना अनेकदा सॅनिटरी पॅड्स वारंवार बदलण्याची सोय उपलब्ध नसते. अशा परिस्थितीत जर पुरवण्यात येणारे पॅड्स निकृष्ट दर्जाचे किंवा रासायनिक दृष्ट्या असुरक्षित असतील तर, त्वचेची जळजळ, युरिन इन्फेक्शन किंवा फंगल इन्फेक्शन यांसारखे गंभीर आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे शाळांमध्ये पुरवल्या जाणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्सची गुणवत्ता उत्तम असणे आवश्यक आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सच्या सूचनांनुसार, ‘BIS IS 5405:2019’ हे मानांकन असलेले पॅड्स सुरक्षित मानले जातात. हे मानांकन असलेले पॅड हानिकारक रसायनांपासून मुक्त असतात आणि त्यांचा दर्जाही उत्तम असतो. सॅनिटरी नॅपकिन्स खरेदी करताना या प्रमाणपत्राची खात्री करणे अत्यंत गरजेचे आहे. उत्तम दर्जाच्या सॅनिटरी पॅडचा पृष्ठभाग मऊ आणि त्वचेला अनुकूल असावा लागतो. चांगल्या दर्जाचे पॅड मासिक पाळीतील द्रव लवकर शोषून घेतात आणि ते आत शोषून घेतल्यामुळे वरचा पृष्ठभाग कोरडा राहतो. यामुळे शाळेत असताना गळती, दुर्गंधी किंवा अस्वस्थता जाणवत नाही. विशेष म्हणजे, अशा पॅड्सची पीएच पातळी 5.5 ते 8.0 च्या दरम्यान असणे आरोग्यासाठी हितकारक असते.

पॅड्सची गुणवत्ता शाळा किंवा घरीही सोप्या पद्धतीने तपासता येऊ शकते. यासाठी पॅडवर थोडे रंगीत पाणी ओतून त्याची शोषण क्षमता तपासता येते. दर्जेदार पॅड पाणी वेगाने शोषून घेते आणि बाजूने गळती होऊ देत नाही. पाणी ओतल्यानंतर काही सेकंदांनी त्यावर स्वच्छ टिशू पेपर दाबून पाहिल्यास, जर टिशू कोरडा राहिला तर त्या पॅडची ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता चांगली आहे असे समजावे. याव्यतिरिक्त, पॅडचा चिकटपणाही योग्य असावा लागतो; तो अंतर्वस्त्राला घट्ट चिकटणारा असावा पण सहजपणे काढता येईल, असाही असावा. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता दर्जेदार सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.