
जगप्रसिद्ध केदारनाथ मंदिरात भाविकांसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. केदारनाथचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना आता मंदिर परिसरात मोबाईल फोन किंवा कॅमेरे घेऊन जाता येणार नाही. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आणि भाविकांना लवकर दर्शन मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरवर्षी लाखो भाविक केदारनाथला भेट देतात. अलिकडच्या काळात, मंदिर परिसर आणि गर्भगृहाचे असंख्य फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेक भाविक मंदिरात रील्स काढण्यात, फोटो घेण्यात, व्हिडीओ शूट करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे रांगेत उभे राहणाऱ्या इतर भाविकांना विलंब होतो. त्यामुळे आता मोबाईलवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा मंदिर प्रशासनाने दिला आहे.
जिल्हा प्रशासन आणि श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने याआधीही असा निर्णय घेतला होता. मात्र, आता त्याची कठोर अंमलबजावणी करण्यासह कारवाईही करण्यात येणार आहे, असे जिल्हा दंडाधिकारी प्रतीक जैन यांनी सांगितले. बद्री-केदार मंदिर समितीचे उपाध्यक्ष विजय कापरवन यांनी सांगितले की, समितीच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.



























































