
गोवंडी परिसरात शनिवारी सकाळी नवीन गौतम नगरमध्ये आग लागल्याची घटना घडली. या आगीत जवळपास 8 ते 10 झोपड्या बाधित झाल्या असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग तब्बल सुमारे तीन तासांच्या प्रयत्नांनंतर नियंत्रणात आणण्यात आली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 10.01 वाजता सोनापूर लेनवरील भीमवाडी रोड येथील जिजामाता मंदिराजवळ नवीन गौतम नगरमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर 10.23 वाजता मुंबई अग्निशमन दलाने (MFB) आगीची नोंद लेव्हल-1 (किरकोळ आग) म्हणून केली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार आग सुरुवातीला चार झोपड्यांपुरती मर्यादित होती. मात्र, काही वेळातच आगीने परिसरातील सुमारे 8 ते 10 झोपड्यांना विळखा घातला.
आगीमुळे फर्निचर, छतावरील पंखे, फॉल्स सिलिंग, विद्युत वायरिंग व अन्य घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले. तरीही या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
आग लागल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत मुंबई पोलिस, स्थानिक विभागीय कर्मचारी, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी तसेच रुग्णवाहिका देखील तात्काळ तैनात करण्यात आल्या. अखेर दुपारी 1.10 वाजता आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले.




























































