ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्पकडून गृह सचिवांच्या पत्नीसोबत फ्लर्टिंग, व्हिडीओ व्हायरल होताच चौफेर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना त्यांच्या वागणुकीमुळे याआधीही अनेकदा टीकेचा सामना करावा लागला आहे. यावेळी व्हाइट हाऊसमधील ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अमेरिकेत मोठा गदारोळ निर्माण झाला आहे.

या पत्रकार परिषदेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प कॅमेऱ्यांसमोर एका महिलेबद्दल खुलेआम कौतुक करताना आणि फ्लर्ट करताना दिसले. विशेष म्हणजे त्या वेळी संबंधित महिलेचे पतीही त्यांच्या बाजूलाच उभे होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच ट्रम्प यांच्या वर्तनावर तीव्र टीका सुरू झाली. अनेकांनी ही महिला नेमकी कोण आहे, याबाबत उत्सुकता व्यक्त केली.

नंतर समोर आलेल्या माहितीनुसार, ट्रम्प ज्या महिलेबद्दल बोलत होते त्या अन्य कोणी नसून ट्रम्प प्रशासनातील गृह विभागाचे (Interior Secretary) सचिव डग बर्गम यांची पत्नी कॅथरीन बर्गम आहेत. ही संपूर्ण घटना व्हाइट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये घडली.

व्हायरल व्हिडिओमध्ये ट्रम्प म्हणताना दिसतात की, त्यांनी एकदा कॅथरीन यांचा घोडेस्वारी करतानाचा व्हिडिओ पाहिला होता. त्या वेळी त्यांनी विचारले की, “ही व्यक्ती कोण आहे?” आणि त्यांचा रोख कॅथरीन यांच्याकडे होता, त्यांच्या पतीकडे नव्हे, असे त्यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांनी पुढे असेही म्हटले की, कॅथरीन यांची ओळख झाल्यानंतरच त्यांनी डग बर्गम यांना गृह सचिवपद देण्याचा निर्णय घेतला.

इतकेच नाही तर ट्रम्प यांनी कॅथरीन यांच्याकडे पाहत “तुमच्यासारख्या व्यक्तीसोबत काम करणे हा एक उत्कृष्ट अनुभव आहे,” असेही म्हटले. मात्र, त्यानंतर त्यांनी लगेचच डग आणि कॅथरीन हे एक अत्यंत सुंदर आणि उत्तम जोडपे असल्याचे सांगून विषय सावरण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, डग बर्गम सध्या अमेरिकेचे गृह सचिव म्हणून कार्यरत असून ट्रम्प प्रशासनात देशाच्या अंतर्गत बाबी आणि संसाधनांची जबाबदारी सांभाळत आहेत. ते यापूर्वी नॉर्थ डकोटा राज्याचे 33 वे गव्हर्नर राहिले आहेत आणि मायक्रोसॉफ्टमध्येही त्यांनी काम केले आहे.

57 वर्षीय कॅथरीन बर्गम या डग बर्गम यांची दुसरी पत्नी असून या दांपत्याला अपत्य नाही. डग बर्गम यांच्या पहिल्या पत्नी करेन स्टोकर यांच्याशी 2003 मध्ये घटस्फोट झाला होता आणि त्या विवाहातून त्यांना तीन मुले आहेत. नॉर्थ डकोटामध्ये डग गव्हर्नर असताना कॅथरीन यांनी ‘फर्स्ट लेडी’ म्हणूनही भूमिका निभावली होती.

या घटनेनंतर ट्रम्प यांच्या वर्तनावर सोशल मीडियासह राजकीय वर्तुळातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रतिष्ठेला साजेशी वागणूक न दिल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.