
दादर येथील स्वातंत्र्यवीर ‘सावरकर सदन’ जागतिक वारसा स्थळ अर्थात हेरिटेज दर्जा मिळण्यास पात्र आहे. याबाबत भारतीय पुरात्त्व सर्वेक्षण विभागाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले.
सावरकर सदनाला वारसा स्थळाचा दर्जा देण्याच्या यापूर्वीच करण्यात आलेल्या शिफारशीवर शिक्कामोर्तब करण्याचे आदेश देण्याच्या मागणीसाठी अभिनव भारत काँग्रेसचे पंकज फडणीस यांनी उच्च न्यायायलात जनहित याचिका केली आहे. त्यांच्या याचिकेवर न्यायालयाच्या आदेशानुसार पुरातत्त्व विभागाने न्यायालयात हे प्रतिज्ञापत्र दाखल केले. पुरातत्त्व विभागाच्या 1958 च्या प्राचीन स्मारके आणि पुरातत्त्व स्थळे आणि अवशेष कायद्यांतर्गत एखादी वास्तू राष्ट्रीय स्मारक किंवा स्थळ संरक्षित घोषित केल्यानंतरच त्याचे जतन होऊ शकते. त्यासाठी संबंधित वास्तू 100 वर्षांपेक्षा पुरातन असणे आवश्यक आहे. सावरकर सदन गजबजलेल्या शहरी भागात असून अद्याप केंद्र सरकारने या वास्तूला संरक्षित स्मारक घोषित केलेले नाही. परंतु या इमारतीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता त्याला वारसा संरक्षण मिळणे आवश्यक असून राज्य किंवा महानगरपालिकेने त्याचे संरक्षण केले पाहिजे, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.
सावरकर सदनचे 1938 मध्ये बांधकाम करण्यात आले. या दोन मजली इमारतीत सावरकर हे 1966 म्हणजे मृत्यूपर्यंत वास्तव्यास होते. हे एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्थळ असून, तिथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांसह बैठका पार पडल्या आहेत. सावरकरांच्या निधनानंतर, 1984 मध्ये अतिरिक्त मजले बांधले गेले. त्यामुळे या इमारतीचे आठ सदनिका असलेल्या बहुमजली इमारतीत रूपांतर झाले.



























































