
म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाच्या माध्यमातून उपनगरात 50 सार्वजनिक ठिकाणी हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहेत. मात्र, वर्षभरात जेमतेम 15 हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत. उर्वरित हिरकणी कक्ष उभारण्यासाठी म्हाडाला जागेची आवश्यकता आहे; परंतु ज्या प्राधिकरणाच्या जागेवर हिरकणी कक्ष उभारायचा आहे त्या प्राधिकरणाकडून वेळेत एनओसी मिळत नसल्यामुळे हिरकणी कक्षांच्या उभारणीची कामे लटकली आहेत.
एनओसी मिळताच कामाला गती देऊ
हिरकणी कक्षाच्या उभारणीसाठी संबधित प्राधिकरणाकडून एनओसी मिळावी यासाठी आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. लवकरच आम्ही संबंधित कार्यालयांना भेटी देणार आहोत. जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनादेखील आम्ही कळवले आहे, जेणेकरून ते त्यांच्या पातळीवर संबंधित प्राधिकरणांना निर्देश देतील. एनओसी मिळताच उर्वरित हिरकणी कक्ष उभारण्याच्या कामाला गती दिली जाईल, असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सार्वजनिक ठिकाणी आपल्या बाळाला स्तनपान करताना महिलांची मोठी गैरसोय होते. त्या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाच्या माध्यमातून मुंबई उपनगरात 50 हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहेत. हिरकणी कक्षासाठी जागा मिळावी म्हणून म्हाडाकडून सरकारी कार्यालये, रुग्णालय, पोलीस स्टेशनला पत्र पाठवण्यात आले होते. त्यानुसार 10 ठिकाणी कामे पूर्ण झाली असून 5 ठिकाणची कामे प्रगतीपथावर आहेत. उर्वरीत 35 हिरकणी कक्ष उभारण्याकरिता जागा मिळावी यासाठी सरकारी कार्यालये, रुग्णालये, सार्वजनिक उद्याने यांच्याशी संपर्प साधण्यात आला आहे. मात्र, संबंधित प्राधिकरणाकडून एनओसी मिळत नसल्यामुळे हिरकणी कक्षाचे काम लटकले आहे.






















































