अजित पवारांच्या तेराव्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करू, रोहित पवार यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी आणि त्यामागील निर्णयप्रक्रियेबाबत भूमिका स्पष्ट केली. रोहित पवार म्हणाले की, पक्षाचे निर्णय घेताना त्या काळात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, मुंडे बंधू यांसारखे नेते सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करत होते. या सर्व चर्चा झाल्यानंतरच कुठेतरी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा झाली आणि त्यानंतर तो निर्णय घेण्यात आला, अशी माहिती आम्हाला नंतर समजली, असे त्यांनी सांगितले.

सुनेत्रा पवार यांच्याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, त्या सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत, मात्र राजकीय क्षेत्रात त्या नवीन आहेत. त्यामुळे एखादा राजकीय निर्णय घेताना, तिथे उपस्थित असलेल्या अनुभवी नेत्यांचे त्यांनी म्हणणे ऐकले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र शेवटी ही एक राजकीय भूमिका आहे आणि पवार कुटुंबाने ठरवले आहे की 13 तारखेपर्यंत कोणतीही राजकीय भूमिका घ्यायची नाही. त्यामुळे तोपर्यंत या विषयावर कोणतेही वक्तव्य केले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

रोहित पवार यांनी सांगितले की, सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार आहे, याची माहिती कोणालाही नव्हती, हे शरद पवार यांनीही स्पष्टपणे सांगितले आहे. त्या काळात बारामतीमध्ये पवार कुटुंबीयांना भेटण्यासाठी लाखो लोक येत होते. त्या वेळी शरद पवार, सुप्रिया पवार, श्रीनिवास पवार, योगेंद्र पवार तसेच रोहित पवार स्वतः बारामतीमध्ये उपस्थित होते आणि नागरिकांची भेट घेत होते.

ते पुढे म्हणाले की, जोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येऊन भेटत नाहीत, आपली भावना व्यक्त करत नाहीत, तोपर्यंत बारामतीमध्येच थांबायचे, अशीच आमची भूमिका होती. मात्र अचानकपणे टीव्ही माध्यमातून ही बातमी समोर आली, आणि ती सर्वांसाठीच अनपेक्षित होती.

रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, हा निर्णय वेगळ्या पक्षाने घेतलेला होता, आणि त्या पक्षाचे त्यावेळचे नेते वेगळे असल्यामुळे त्या निर्णयप्रक्रियेत शरद पवार किंवा पवार कुटुंबातील कोणाचाही कोणताही सहभाग नव्हता. त्या निर्णयाशी आमचा थेट किंवा अप्रत्यक्ष काहीही संबंध नव्हता. तसेच 9 तारखेनंतर म्हणजेच दादांचा तेरावा झाल्यानंतर आपण याच्यावर स्पष्टपणे त्या ठिकाणी चर्चा करूयात असेही रोहित पवार म्हणाले.