
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा खेळ असून यात मध्यमवर्गीय, शेतकरी, देशातील युवा वर्गासाठी विशेष असे काहीही ठोस केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे या सर्व वर्गांचा पुन्हा एकदा भ्रमनिरास झाला आहे. सर्वाधिक कर उत्पादन देणाऱ्या महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्र सरकारची दुजाभावाची वागणूक याही वेळी कायम राहिली आहे, अशी टीका काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी केली आहे.
अमित देशमुख यांनी ट्वीटरवर (X) पोस्ट करत केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली आहे. ते म्हणाले की, “देशात प्रचंड गतीने वाढत असलेली महागाई नियंत्रणासाठी या अर्थसंकल्पात कोणतीही तातडीची उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे सामान्य कुटुंबाचा खर्च कमी होण्याऐवजी तो वाढण्याचीच शक्यता जास्त आहे. तरुणांसाठी रोजगार निर्मिती, उद्योग प्रोत्साहन आणि कौशल्य विकासाच्या योजना जाहीर झाल्या असल्या तरी त्यासाठी तुटपुंज्या निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे देशातील युवावर्गाला दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे.” अशी खंत अमित देशमुख यांनी व्यक्त केली.
“या अर्थसंकल्पात शेतीमालाला हमीभाव, कर्जमाफी यासंदर्भात घोषणा अपेक्षित होती, मात्र तसेही घडलेले नाही. ग्रामीण विकासासाठी निधी वाढण्याऐवजी तो मर्यादितच ठेवल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. यावर्षीचा अर्थसंकल्प मांडताना कर रचनेत बदल घडवून मध्यमवर्गीयांना आर्थिक दिलासा दिला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, मात्र तीही फोल ठरली आहे. निवडणुकीतील आश्वासनासारखी आश्वासने या अर्थसंकल्पात दिली गेल्यामुळे हा अर्थसंकल्प देशाच्या विकासासाठी नव्हे, तर अल्पकालीन राजकीय फायद्यांसाठी सादर केला आहे.” असे स्पष्टपणे जाणवत असल्याचं अमित देशमुख म्हणाले आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा खेळ असून यात मध्यमवर्गीय, शेतकरी, देशातील युवा वर्गासाठी विशेष असे काहीही ठोस केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे या सर्व वर्गांचा पुन्हा एकदा भ्रमनिरास झाला आहे. सर्वाधिक कर उत्पादन देणाऱ्या…
— Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) February 1, 2026




















































