
अजित पवारांना शरद पवार यांच्याविषयी आदर व ओलावा होता. त्यातूनच दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा व प्रक्रिया सुरू झाली. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर त्याबाबत अंतिम निर्णय होण्याचे ठरले, पण अजित पवारच निघून गेले. पटेल-तटकरे यांना विलीनीकरण नको आहे. हा अमित शहा व फडणवीस यांचाच ‘अजेंडा’ आहे. अजित पवारांच्या जाण्याने पवार कुटुंबात व राज्याच्या घडामोडीत गुंता वाढला. गुंता सुटू नये यातच अनेकांचा स्वार्थ आहे. पुढचे पुढे पाहू. महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या. त्यांचे अभिनंदन! सुतक काय, येते आणि जाते. राजकारण थांबवून कसे चालेल? राजकारण खरोखरच लई वंगाळ झाले आहे.
अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यातून महाराष्ट्र सावरला नाही तोच अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय खेळीने दुसरा धक्का दिला आहे. अजित पवार यांच्या चितेची आग विझण्याआधीच सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर संमिश्र लोकभावना आहेत. महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या अशा भावना काही लोकांनी व्यक्त केल्या. हे पद काही कर्तृत्वाने मिळाले असे नाही. मात्र ही घडामोड नक्की कोणाच्या इच्छेने झाली? हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. शरद पवार यांनी शांतपणे याचे उत्तर दिले आहे. ‘‘सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही. त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे व अजित पवारांनंतर पटेल, तटकरे वगैरे लोक पक्षाची धुरा सांभाळत आहेत.’’ सुप्रिया सुळे यांनीही त्याच पद्धतीने मत व्यक्त केले. म्हणजे सुनेत्रा पवार त्यांच्या दोन मुलांसह दुसऱ्याच दिवशी मुंबईला पोहोचल्या व आपण उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला राजभवनात जात आहोत याचा सुगावा कुटुंबाला लागू दिला नाही. अजित पवारांच्या भाषेत सांगायचे तर ‘‘सध्या राजकारण लई वंगाळ झालं आहे’’ आणि या राजकारणाचे सूत्रधार ‘भाजप’चे सध्याचे नेतृत्व आहे. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करायचे की आणखी काही हा सर्वस्वी त्यांचा स्वतःचा व पक्षाचा निर्णय आहे. पक्ष अजित पवार यांचाच होता व अजित पवारांच्याच नेतृत्वाखाली आमदारांचा गट सत्तेत सामील झाला. त्यामुळे पवारांच्या निधनानंतर पक्षाचे भवितव्य काय? नेता कोण? हे प्रश्न होतेच. म्हणून मुश्रीफ यांनी सांगितले की, ‘‘अजितदादांनंतर पक्षाचे कार्यकर्ते व आमदार सैरभैर होऊ नयेत म्हणून सुनेत्रा पवार यांना
घाईघाईने नेतेपदी
निवडले.’’ मुश्रीफ यांचे म्हणणे खरे मानले तरी एक गोष्ट महत्त्वाची, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची युती ‘सनातनी’ विचारांच्या भाजपबरोबर आहे व घरात सुतक सुरू असताना असा शपथ सोहळा हिंदुत्वाच्या चौकटीत बसत नाही. सत्य वेगळेच आहे. दादांच्या निधनानंतर पक्षात अस्वस्थता निर्माण झाली. पोशिंदा व पालक निघून गेल्याने पोरकेपणाची जाणीव वाटली. त्यानंतर काही जणांच्या महत्त्वाकांक्षांना उधाण आले व उपमुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी धडपड सुरू झाली. प्रफुल पटेल व सुनील तटकरे यांच्यात वाद आहे. पवार-पाटलांचा पक्ष हा पटेलांचा पक्ष होऊ नये म्हणून काही जणांनी धावाधाव करून सुनेत्रा पवार यांना उपसिंहासनावर बसवले. याचा अर्थ, अजित पवारांचा पक्ष पुढे टिकेल व चालेल असे नाही. भरसागरात नौकेचा नावाडी निघून गेला आहे व नौकेतील प्रत्येक जण नौका आपापल्या पद्धतीने वल्हवत आहे. सुनेत्रा पवार यांना नावेत चढवल्याने नाव वादळातून बाहेर पडेल काय? अर्थात, या नावेला फडणवीस यांचे इंजिन आहे व इंजिनाचा ‘रिमोट’सुद्धा फडणवीसांकडे आहे. भविष्यात शिंदे व अजित पवार यांच्या पक्षांचे काय होईल ते समजून घेणे महत्त्वाचे आहे. पुढील लोकसभा निवडणुकीला अजून वेळ आहे, पण 2029 ची विधानसभा भाजप ‘शत प्रतिशत’ स्वबळावर लढणार, हे निश्चित आहे. त्याआधी शिंदे गट व अजित पवारांच्या पक्षातील अनेक आमदार भाजपमध्ये जातील. त्या वेळीच सुनेत्रा पवार यांची खरी कसोटी लागेल. पटेल-तटकरे हे स्वतः निवडून येण्याची मारामार, तेथे पक्षाचे आमदार ते निवडून कसे आणणार? त्यामुळे शिंदे व सुनेत्रा पवारांचे पक्ष पूर्णपणे
फडणवीस यांच्या मेहेरबानीवरच
अस्तित्व टिकवू शकतील. सुनेत्रा पवारांचे उपमुख्यमंत्रीपद म्हणजे शोभेचे ठरू नये. अजित पवारांचे कर्तृत्व, कष्ट करण्याची क्षमता, अफाट लोकसंग्रह व भाजपसमोर फार न झुकण्याची किमया त्या दाखवू शकल्या तर त्यांचे स्वतंत्र स्थान निर्माण होऊ शकेल. उपमुख्यमंत्रीपदास संवैधानिक मान्यता नाही, पण त्यांच्याकडे असलेल्या खात्यांना महत्त्व असते. अजित पवारांकडे असलेले अर्थ, नियोजन खाते महत्त्वाचे होते व त्यामुळे आमदार, कार्यकर्त्यांना सढळ हस्ते निधी वाटप होत असे. निवडणुकांतही अजित पवारांनी मोठ्या प्रमाणावर खर्च केला. आमदार-कार्यकर्त्यांची बरी-वाईट कामे केली. सुनेत्रा पवार हे कसे हाताळतात, ते पाहावे लागेल. खिडकी उघडली की, हवेबरोबर विषारी कीटकही आत येतात याचाही अनुभव सुनेत्रा पवार घेतील. कदाचित त्या ‘गुंगी गुडिया’ न बनता प्रभावीपणे काम करतील. तेव्हा पटेल, तटकरे, भुजबळांची अडचण होईल. सुनेत्रा पवार म्हणजे अजित पवार नाहीत. अजित पवारांना शरद पवार यांच्याविषयी आदर व ओलावा होता. त्यातूनच दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा व प्रक्रिया सुरू झाली. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर त्याबाबत अंतिम निर्णय होण्याचे ठरले, पण अजित पवारच निघून गेले. पटेल-तटकरे यांना विलीनीकरण नको आहे. हा अमित शहा व फडणवीस यांचाच ‘अजेंडा’ आहे. अजित पवारांच्या जाण्याने पवार कुटुंबात व राज्याच्या घडामोडीत गुंता वाढला. गुंता सुटू नये यातच अनेकांचा स्वार्थ आहे. पुढचे पुढे पाहू. महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या. त्यांचे अभिनंदन! सुतक काय, येते आणि जाते. राजकारण थांबवून कसे चालेल? राजकारण खरोखरच लई वंगाळ झाले आहे.






























































