
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर आज प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपला सांगितल्याशिवाय अजितदादा अशी चर्चा करतील का, असा सवाल त्यांनी केला. दादांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी आमची भेट झाली होती आणि तासभर आमच्या गप्पा झाल्या, पण या विषयावर काहीच बोलणे झाले नाही, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे विलीनीकरण करायचे असेल तर भाजपशी चर्चा करावी लागेल, अशी अजब अटही त्यांनी घातली आहे.
अजितदादा सरकारमध्ये स्थिर होते, विलीनीकरण करायचे असते तर त्यांनी भाजपला सांगितले असते, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. विलीनीकरणाबद्दल त्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती की नाही याबद्दल आपल्याला माहिती नाही. अजितदादा आणि आपले चांगले संबंध होते. ते सर्वकाही माझ्यासोबत शेअर करायचे. विलीनीकरणाबद्दलही ते बोलले असते, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादीच्या एकीकरणामुळे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. एकीकरणानंतर शरद पवार यांना सरकारमध्ये सहभागी व्हावे लागेल किंवा अजित पवार गटाला सरकारबाहेर पडावे लागेल. त्यामुळेच फडणवीस यांनी एकीकरणापूर्वी भाजपशी चर्चेचा आग्रह धरला असल्याचे सांगितले जाते.


























































