
अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या खेळपट्टीवर राजकारण आणत पाकिस्तानी सरकारने क्रिकेटविश्वाला हादरवणारा निर्णय घेतला आहे. स्पर्धेत सहभागी होण्यास मान्यता देतानाच पाकिस्तान सरकारने 15 फेब्रुवारीला कोलंबोत होणाऱया हिंदुस्थानविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा संघ मैदानात उतरणार नसल्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच स्पर्धा खेळायची, पण हिंदुस्थानविरुद्धच्या लढतीत खेळायचे नाही, अशी आक्रमक भूमिका पाकिस्तानने घेत बांगलादेशच्या बहिष्कारवृत्तीच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. या निर्णयामुळे टी –20 वर्ल्ड कपला राजकीय वॉरचे रूप प्राप्त झाले आहे. पाकिस्तानच्या या निर्णयाबाबत आयसीसी कोणते ठोस पाऊल उचलतेय याकडे लक्ष लागले आहे.
बांगलादेशने वर्ल्ड कपवर बहिष्कार घातल्यापासूनच आयसीसीच्या विरोधात उघड भूमिका घेणारे पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) मोठी भूमिका घेण्याच्या तयारीत होते. अखेर त्यांच्याशी चर्चा करून पाकिस्तान सरकारने आपल्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावरून आपला निर्णय जाहीर करत क्रिकेटमध्ये भूकंप घडवला. त्यांनी निवेदनात संघाच्या सहभागाला परवानगी देण्यात आल्याचे नमूद करताना, हिंदुस्थानविरुद्ध सामना खेळण्यास नकार देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. या एका घोषणेमुळे संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक, आयोजन आणि आयसीसीची विश्वासार्हता यावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
हिंदुस्थान-पाकिस्तान सामना म्हणजे कोणत्याही आयसीसी स्पर्धेचा कणा असतो. प्रेक्षकांची अफाट गर्दी, प्रचंड प्रसारण महसूल आणि जागतिक स्तरावरील लक्ष या सामन्याभोवती केंद्रित असते. अशा सामन्यावर बहिष्कार टाकत पाकिस्तानने केवळ क्रिकेटलाच नाही, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अधिकारालाही थेट आव्हान दिले आहे. क्रिकेटच्या खेळपट्टीवर पाकिस्तानचे राजकारण पुन्हा एकदा उघडपणे समोर आले आहे. याचा मोठा फटका पाकिस्तान क्रिकेटला बसणार, हे नक्की आहे. या निर्णयाचे परिणाम त्यांना कशा रूपाने भोगावे लागतील, हे येत्या काही दिवसांत दिसून येईलच. या निर्णयामागची पार्श्वभूमीही तितकीच तीव्र आहे. बांगलादेशचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवावेत, ही बांगलादेश क्रिकेट मंडळाची मागणी आयसीसीने फेटाळल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता. त्याचबरोबर बीसीसेआयच्या भूमिकेवरही पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली होती. त्या क्षणापासूनच पाकिस्तानने बहिष्कार घालण्याची भाषा सुरू झाली होती.























































