
वर्षभरात तब्बल ११ हजार भिवंडीकरांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट उडाली असून लहान मुले तर घराबाहेर पडायलाही घाबरत आहेत. दरम्यान भटक्या कुत्र्याने लचके तोडल्याने चिमुकल्या हमीद खानचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील पिसाळलेल्या तसेच भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून त्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी भिवंडीकरांनी महानगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.
भिवंडीतील भटक्या कुत्र्यांना आळा घालण्यासाठी महापालिकेने निर्बिजीकरण केंद्र सुरू केले होते. गेली १२ वर्षे हे केंद्र बंदच होते. गेल्या वर्षभरापासून निर्बिजीकरण केंद्र पुन्हा कार्यान्वित करण्यात आले. मात्र दरम्यानच्या काळात शहरात ठिकठिकाणी भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत गेली.
भिवंडीच्या इदगाह परिसरात घराबाहेर खेळत असताना येथील भटक्या कुत्र्याने हमीद खान याच्यावर १० जानेवारी रोजी हल्ला केला होता. तसेच चेहरा व मानेचे अक्षरशः लचके तोडले. त्याला तातडीने इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार घेतल्यानंतर हमीदला काही काळ बरे वाटले. मात्र २७जानेवारीला त्याला पुन्हा त्रास सुरू झाल्याने मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथे उपचार घेत असतानाच शनिवारी त्याचा मृत्यू झाला.
स्थानिक लोकप्रतिनिधींचा आरोप
हमीद खान याला भिवंडीतील रुग्णालयात योग्य ते उपचार न झाल्याने तसेच अॅण्टी रेबीज लस वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे त्याला आपले प्राण गमवावे लागले, असा आरोप स्थानिक आमदार रईस शेख यांनी केला आहे. तर रेबीजचे तिनही डोस हमीद याला वेळोवेळी दिले होते. मात्र २७ जानेवारी रोजी त्याला श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने नातेवाईक रुग्णालयातून घेऊन गेले व पुढील उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल केल्याची माहिती इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. माधवी पंधारे यांनी दिली.





























































