दलाई लामा यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाल्याने चीनचा तिळपापड; दर्शवला तीव्र विरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तिबेटी आध्यात्मिक नेते दलाई लामा यांना त्यांच्या स्पोकन-वर्ड एल्बमसाठी ६८ व्या ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. चीनने या पुरस्काराचा निषेध केला आहे आणि चीनविरोधी कारवायांसाठी त्याचा वापर केल्याचा आरोप केला आहे. दलाई लामा यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाल्याने चीनचा तिळपापड झाल्याचे दिसून येत आहे. तिबेटी आध्यात्मिक नेते दलाई लामा यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाल्याने चीन संतापला आहे. चीनने दलाई लामा यांना देण्यात आलेल्या ग्रॅमी पुरस्काराचा निषेध केला आणि म्हटले की ते चीनविरोधी कारवायांसाठी ग्रॅमी पुरस्काराच्या धर्माच्या आडून वापर करण्यात आला आहे, त्याला आमचा तीव्र विरोध आहे.

लॉस एंजेलिस येथे झालेल्या ६८ व्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये दलाई लामा (तेन्झिन ग्यात्सो) यांनी त्यांच्या “मेडिटेशन्स: द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज होलिनेस द दलाई लामा” या त्यांच्या स्पोकन-वर्ड अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट ऑडिओबुक, नॅरेशन आणि स्टोरीटेलिंग रेकॉर्डिंग श्रेणीमध्ये पहिला ग्रॅमी जिंकला.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून दलाई लामा यांच्या पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया देण्यात आली. ९० वर्षीय आध्यात्मिक नेते धर्माच्या नावाखाली फुटीरतावादी कारवाया करत आहेत, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान म्हणाले. लिन जियान यांनी एका मीडिया ब्रीफिंगमध्ये सांगितले की दलाई लामा हे केवळ एक धार्मिक व्यक्ती नाहीत. ते धर्माच्या नावाखाली चीनविरोधी फुटीरतावादी कारवायांमध्ये गुंतलेले एक राजकीय निर्वासित आहेत. चीनविरोधी कारवायांसाठी ग्रॅमी पुरस्काराचा वापर करण्यास आम्ही तीव्र विरोध करतो.

पुरस्कार मिळाल्यावर दलाई लामा म्हणाले की ग्रॅमी पुरस्कार जिंकणे ही वैयक्तिक कामगिरी नाही, तर सामायिक जागतिक जबाबदारीची ओळख आहे. या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सन्मानाबद्दल प्रतिक्रिया देताना दलाई लामा यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि म्हटले की, “मी हा सन्मान कृतज्ञता आणि नम्रतेने स्वीकारतो. मी तो वैयक्तिक मानत नाही, तर आपल्या सामायिक जागतिक जबाबदारीची ओळख आहे. जगातील सर्व आठ अब्ज लोकांच्या कल्याणासाठी शांती, करुणा, पर्यावरणाची काळजी आणि मानवतेच्या एकतेची समज आवश्यक आहे यावर माझा ठाम विश्वास आहे. हा ग्रॅमी पुरस्कार माझा संदेश पुढे नेण्यास मदत करेल याबद्दल मी कृतज्ञ आहे, असे ते म्हणाले.