
राज्याच्या कानाकोपऱयात प्रवासी सेवेत धावणाऱया एसटी महामंडळाला अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने कामकाजाचा गाडा हाकावा लागत आहे. महामंडळात चालकांची 20 हजार पदे, तर 4 हजार सहाय्यक पदे रिक्त आहेत. याचा प्रवासी सेवा आणि उत्पन्नावर विपरित परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर नियमित कर्मचारी भरतीच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्या, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने सरकारकडे केली आहे.
एसटी महामंडळामध्ये मागील 10 वर्षे नोकरभरती झालेली नाही. याचदरम्यान परिवहन मंत्र्यांनी 17450 पदे बाह्य संस्थेकडून कंत्राटी पद्धतीने भरण्याच्या निर्णयाची घोषणा यांनी केली होती. त्यानुसार बाह्यसंस्थेकडून पात्र उमेदवारांची नावे मागवली आहे. यातून मध्यस्थ – दलालांचे हित साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हणणे महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने मांडले आहे. यासंदर्भात संघटनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. महामंडळामधील चालकांची 20 हजार पदे आणि 4 हजार सहाय्यक रिक्त पदे तातडीने सरळसेवा भरतीद्वारे भरण्यात यावी, पंत्राटी कर्मचारी भरतीऐवजी नियमित कर्मचारी भरती प्रस्तावाला मंजुरी द्यावी, अशी मागणी केली आहे.
सुरक्षित ड्रायव्हिंगचे कौशल्य नसलेले कंत्राटी चालक
एसटी, बेस्ट उपक्रमात कंत्राटी पद्धतीने चालकांची नियुक्ती करण्याच्या प्रक्रियेवर महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या वाहन पुरवठादाराकडून कंत्राटी पद्धतीने चालक नियुक्त केले जात आहेत. पुरेसा अनुभव आणि सुरक्षित ड्रायव्हिंगचे कौशल्य नसलेल्या कंत्राटी चालकांच्या हाती स्टिअरिंग दिले जात असल्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत, असा दावा खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.






























































