
प्रसिद्ध हार्मोनियमवादक सीमा शिरोडकर यांचे सोमवारी अबुधाबी येथे हृदयविकाराने निधन झाले. त्या 60 वर्षांच्या होत्या. त्यांच्या जाण्याने संगीत मैफलीतील सुरेल साथसंगत हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
प्रसिद्ध तबलावादक पंडित विश्वनाथ शिरोडकर यांच्या त्या पत्नी. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात सीमा शिरोडकर यांचे मोठे योगदान आहे. अनेक वर्षे सोलो हार्मोनियम वादन आणि ख्यातनाम कलावंतांना साथसंगत करताना त्यांनी आपल्या जादुई बोटांनी श्रोत्यांना अलौकिक स्वरसाजाची पर्वणी दिली. त्यांचे ‘याद पिया की आये ही ’ ठुमरीचे सूर तर कधीच विसरता येणार नाहीत. सीमा यांनी देशविदेशात हार्मोनियमवादनाचे अनेक कार्यक्रम केले. अनेक शिष्यगण घडवले.
संवादिनीवादन क्षेत्रात महिलांचे प्रमाण कमी असताना सीमा शिरोडकर यांनी मात्र आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवला. सीमा शिरोडकर यांच्या घरात संगीताचा वारसा होता. त्यांचे वडील पायपेटीवर भजने गात. त्यांनी सुरुवातीच्या काळात आतेभाऊ उमेश इन्सुलकर यांच्याकडून शिक्षण घेतले. त्यानंतर प्रसिद्ध हार्मोनियमवादक पंडित तुळशीदास बोरकर व पंडित विश्वनाथ पेंढारकर यांच्याकडे तालीम घेतली. प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर-टिकेकर, अश्विनी भिडे-देशपांडे, पद्मा तळवलकर, वीणा सहस्रबुद्धे, राशीद खान यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या मैफलींना साथसंगत करण्याची संधी शिरोडकर यांना मिळाली. सहजसुंदर वादन, गायकाला डिस्टर्ब न करणारी खरी रंगतदार संगत, प्रचंड रियाज आणि आत्मविश्वास ही त्यांच्या वादनाची वैशिष्टय़े होती.



























































