
बारामती येथे 28 तारखेला झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर 29 तारखेला बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यविधीसाठी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता. मात्र, या प्रचंड गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी सुमारे 20 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल चोरल्याची घटना उघडकीस आली आहे.
मुंबई तकने याबाबत वृत्त दिले आहे. अंत्यसंस्काराच्या वेळी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर राजकीय नेते, कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, या गर्दीत काही सराईत गुन्हेगारही घुसले होते. त्यांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या, दागिने तसेच काहींची पाकिटे चोरून एकूण सुमारे 20 लाख रुपयांची चोरी केल्याचे समोर आले आहे.
या घटनेनंतर बारामती तालुका पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी दाखल झाल्या. त्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून तांत्रिक माहिती आणि अन्य तपासाच्या आधारे कारवाई करत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. सध्या या आरोपींकडून पुढील तपास सुरू असून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राजकुमार बाबुराव आठवले (रा. गेवराई, जिल्हा बीड), मोहम्मद अनिस मोहम्मद युनुस (यवतमाळ), एजाज मीरावले (यवतमाळ), मोहम्मद गफ्फार (यवतमाळ), बाळू दत्तात्रय धोतरे (रा. अहिल्यानगर), तुषार मासाळ (अहिल्यानगर जिल्हा) आणि नितीन अंकुश गायकवाड (बीड जिल्हा) यांचा समावेश आहे.
दरम्यान, या घटनेमुळे शोकसभेच्या ठिकाणी झालेल्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास आणि मुद्देमाल जप्तीची कारवाई वेगाने सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.


























































