
हिंदुस्थानसोबत व्यापार करार झाल्यामुळे अमेरिकन शेतकरी समृद्ध होतील, असा दावा अमेरिकेच्या सचिव ब्रुक रोलिन्स यांनी केला. त्यांच्या या दाव्याने खळबळ उडाली असून त्यावर हिंदुस्थाननेही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. या व्यापार करारामुळे भारतीय बाजारपेठेत अमेरिकन कृषी उत्पादनांची निर्यात वाढेल असा विश्वास रोलिन्स यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे अमेरिकन शेतकरी मालामाल होतील,असे त्यांनी म्हटले आहे.
हिंदुस्थान-अमेरिका व्यापार कराराच्या घोषणेनंतर हिंदुस्थानातील आयातीवरील शुल्क १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. या व्यापार कराराबाबत अमेरिकेचे कृषी सचिव ब्रुक रोलिन्स यांनीही एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी सांगितले की या व्यापार करारामुळे भारतीय बाजारपेठेत अमेरिकन कृषी उत्पादनांची निर्यात वाढण्याची अपेक्षा आहे. अमेरिका-हिंदुस्थान करारामुळे हिंदुस्थानच्या मोठ्या बाजारपेठेत अमेरिकन कृषी उत्पादनांची निर्यात वाढेल. २०२४ मध्ये हिंदुस्थानसोबत अमेरिकेची कृषी व्यापार तूट १.३ अब्ज डॉलर्स होती. हिंदुस्थानची वाढती लोकसंख्या ही अमेरिकन कृषी उत्पादनांसाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि हा करार ही तूट कमी करण्यास मदत करेल.
अमेरिकन सचिवच्या य दाव्यानंतर हिंदुस्थानातील उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करारात भारतीय कृषी उत्पादनांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सरकार कृषी उत्पादनांबाबतच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे. शेती आणि दुग्धव्यवसायावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. शेती आणि दुग्धव्यवसायात हिंदुस्थानच्या हिताला प्राधान्य होते, आहेत आणि ते कायम राहील.

























































