भाजप मोठ्या प्रमाणात SIR मध्ये फेरफार करण्याची तयारी करत आहे – अखिलेश यादव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसआयआर प्रक्रियेवरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजप मोठ्या प्रमाणात एसआयआरमध्ये फेरफार करण्याची तयारी करत आहे, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे. उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे एका कार्यक्रमात बोलताना ते असं म्हणाले आहेत.

अखिलेश यादव म्हणाले आहेत की, “राज्यभरातून फॉर्म ७ बाबतचे अहवाल येत आहेत आणि मिळालेल्या माहितीवरून असे दिसून येते की, भाजप मोठ्या प्रमाणात हेराफेरी करण्याची तयारी करत आहे. ही माहिती मिळताच आम्ही सोशल मीडियावर हा मुद्दा उपस्थित केला आणि त्याच प्लॅटफॉर्मचा वापर करून तक्रारी दाखल केल्या. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे आणि निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रारी सादर केल्या आहेत.”

याआधी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना हिंदुस्थान–अमेरिका व्यापार करारावर अखिलेश यादव यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, ” भाजप सरकार कोणत्या दबावाखाली हे निर्णय घेत आहे, याचे उत्तर देशाला दिले पाहिजे. हिंदुस्थानचे बाजार अमेरिकेतील कृषी उत्पादने आणि खाद्यान्नांसाठी खुले करणे म्हणजे हिंदुस्थानातील शेतीवर उपजीविका अवलंबून असलेल्या सुमारे 70 टक्के लोकसंख्येशी थेट फसवणूक आहे.”

ते म्हणाले की, “भाजप आणि त्यांचे साथी स्वातंत्र्यपूर्व काळातही परकीयांचे एजंट होते आणि आजही तेच काम करत आहेत. आत्मनिर्भरता आणि स्वदेशीची भाषा करणाऱ्या भाजपने हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेशी विश्वासघात करण्यासाठी किती कमिशन घेतले, हे जनतेसमोर जाऊन सांगावे.”