कणकवलीत वीजपुरवठा खंडित; संतप्त व्यापाऱ्यांची वीज उपकेंद्रावर धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महावितरणच्या शहरातील वीज उपकेंद्रातील दुरुस्तीच्या कामासाठी सोमवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित ठेवण्यात आला होता. मात्र, जाहीर वेळ संपल्यानंतरही वीजपुरवठा सुरू न झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला. अखेर संतप्त व्यापाऱ्यांनी थेट महावितरणच्या वीज उपकेंद्रावर धडक देत उपकार्यकारी अभियंता संदीप पाटील व सहाय्यक अभियंता ओंकार स्वामी यांना जाब विचारला.

शहरातील वीजपुरवठा सोमवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतरही दीड ते दोन तास वीज न आल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. विशेषतः सध्याचा व्यापारी सिजन सुरू असताना वीजपुरवठा खंडित राहिल्याने व्यवसायावर गंभीर परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. वीजपुरवठा पुन्हा सुरू करताना हाय-व्होल्टेज वाढून अनेक व्यापाऱ्यांची विद्युत उपकरणे निकामी होत असल्याचेही यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, तसेच दीड-दोन तास लाईट नसल्याने झालेले नुकसान विद्युत बिलातून कमी करण्यात यावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.

महावितरणकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे वारंवार लोडशेडींगचा सामना करावा लागत असून, शहरातील वीजविषयक कामे तातडीने पूर्ण करून ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांच्या वतीने राजा राजाध्यक्ष व विलास कोरगावकर यांनी केली. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. सध्या व्यापाऱ्यांचा महत्त्वाचा सिजन सुरू असल्याने भविष्यात शहरातील विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरणने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, ज्येष्ठ व्यापारी विजय उर्फ बापू पारकर, बंडू खोत, हेमंत गोवेकर आदी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.