
शेवगाव तालुक्यातील बेलगाव येथील बहुचर्चित गायके खून खटल्याचा निकाल आज (दि. 3) लागला. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एच. शेख यांना तीनही मुख्य आरोपींना दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
जालिंदर आसाराम गायके (50), बाळासाहेब आसाराम गायके (46) आणि तुकाराम ज्ञानदेव गायके (42, सर्व रा. बेलगाव, ता. शेवगाव) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी नानासाहेब बाळासाहेब गायके आणि आरोपी यांच्यातील पूर्वीपासूनच्या कौटुंबिक वादातून 4 मे 2019 रोजी दुपारी 2 च्या सुमारास फिर्यादी नानासाहेब आणि त्यांचे वडील बाळासाहेब अश्रू गायके यांना चापडगाव माथा शिवारात आरोपींनी अडवून शिवीगाळ करत मारहाण केली. आरोपी जालिंदर गायके याने कुऱ्हाडीने फिर्यादीच्या डोक्यात वार केला. त्यानंतर, आरोपी जालिंदर व तुकाराम गायके यांनी बाळासाहेब यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून त्यांना जखमी केले. या हल्ल्यात बाळासाहेब गायके यांचा मृत्यू झाला होता. गंभीर जखमी नानासाहेब गायके यांच्या जबाबावरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अर्जुन बी. पवार यांनी एकूण 17 साक्षीदार तपासले. न्यायालयाने तिन्ही आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी 2 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. तसेच 10 वर्षे सक्तमजुरी व दंड आणि कारावासाची शिक्षा ठोठावली.





























































