
वाळूज-पंढरपूरकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या अॅपेरिक्षाने छावणी परिसरात उभ्या जीपला पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी जबर होती, की रिक्षाचालक व एक महिला प्रवासी गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. तसेच इतर प्रवासी जखमी झाल्याने त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. हा अपघात सोमवारी मध्यरात्री रात्री दीड वाजता झाला.
शहराकडून वाळूज पंढरपूरकडे अॅपेरिक्षात रईस हासिम शेख (३५, रा. रांजणगाव शेणपुंजी) हा प्रवासी घेऊन जात होता. नगरनाक्याच्या पुढे गेल्यानंतर ही रिक्षा एका उभ्या जीपला पाठीमागून धडकली. हा अपघात इतका गंभीर होता, की त्यात चालक रईस शेखचे डोके रिक्षाच्या वरच्या अँगलमध्ये गुंतले, तर दोन्ही बाजूचा पत्रा पाठीमागे आल्याने त्यात चालक अडकला होता. त्यात रईस हासीम शेख व प्रवासी रुक्मिणी येणगे हे दोघे जागीच ठार झाले. तर शीतल मोरे (२४), पायल वरदे (१९, रा. शिवनेरी कॉलनी, रांजणगाव शेणपुंजी) हे गंभीर जखमी झाले.
दरम्यान, या अपघाताची माहिती आकाश माळी यांनी अग्निशमन विभागाला कळविली. माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन केंद्र अधिकारी विजय राठोड, ड्युटी अधिकारी दीपराज गंगावणे, अग्निशामक जवान संग्राम मोरे, प्रसाद शिंदे, महेंद्र खोतकर, छत्रपती केकान, जगदीश गायकवाड, अमिताभ कराड, वाहन चालक चंद्रसेन गीते यांनी घटनस्थळी धाव घेतली.
जखमींना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले असता चालक रईस शेख व रुक्मिणी येणगे या दोघांना तपासून मयत घोषित करण्यात आले. तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद छावणी पोलीस ठाण्यात करण्यात आली.
कटरने रिक्षा कापून चालकाला काढले बाहेर
हा अपघात इतका भीषण होता की, रिक्षाच्या समोरील भागाचा चुराडा झाला होता. त्यामुळे रिक्षाचालक रईस शेख हा रिक्षात अडकला होता. अग्निशमन विभागाच्या पथकाने रिक्षा कापून जखमी चालकाला बाहेर काढले होते.






























































