
बारामती येथे 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून त्यांच्या अपघाताबाबत वेगवेगळ्या शंकाही उपस्थित केल्या जात आहेत. अशात विमान अपघातापूर्वी अजित पवार यांनी कार्यकर्त्याला शेवटचा फोन कॉल केल्याचे समोर आले आहे. अजितदादांनी 8 वाजून 37 मिनिटांनी कार्यकर्त्याला कॉल केला होता. याची ऑडिओ क्लिप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने बुधवारी पत्रकार परिषद घेत समोर आणली.
अजित पवार यांच्या चार्टर्ड विमानाचा 28 जानेवारीला सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी बारामती विमानतळाजवळ अपघात झाला. हा अपघात होण्यापूर्वी 8 मिनिटे आधी अजित पवार यांनी चुलत पुतणे आणि पक्षाचे कार्यकर्ते श्रीजीत पवार यांच्याशी फोन कॉलवरून शेवटचा संवाद साधला होता.
राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला होता. याच निवडणुकीसंदर्भात श्रीजीत पवार यांनी अजित पवारांना एक मेसेज पाठवला होता. यानंतर अजित पवारांनी फोन कॉल करून श्रीजीत पवार यांच्या शंकांचे निरसन केले होते. बारामती विमानतळावर लँड होण्याआधी रेंजमध्ये आल्यावर अजित पवारांनी हा कॉल केला होता. याचे फोन रेकॉर्डिंग आता श्रीजीत पवार यांनी सार्वजनिक केले आहे.
अजितदादांचे शेवटचे शब्द…
अजित पवार – माहिती नसते, काही नसते.. उगीच काहीतरी करायचे. आम्हीही सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन जातो बाळा.
श्रीजीत पवार – अजितदादा, मला जे वाटले ते मी तुमच्यासमोर मांडले
अजित पवार – मान्य आहे, बरोबर आहे. पण मी माळी समाजाला जिल्हा परिषदेची उमेदवारी आत्ता दिलेली आहे. तिथे ओबीसींचे आरक्षण होते. इतर पक्षांनी दुसरेच उमेदवार दिले आहेत. आपण असे काम केलेय.
श्रीजीत पवार – दादा तुम्हाला जो योग्य वाटतो तो अंतिम निर्णय घ्या.
अजित पवार – ठीक आहे, ओके.



























































