भारतीय कामगार सेनेमुळे विमानतळावरील कर्मचाऱ्याच्या पत्नीला दोन लाखांची मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विमानतळावरील ओमेगा एंटरप्रायझेस (पार्किंग विभाग) कंपनीतील कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला 2 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी भारतीय कामगार सेनेने यशस्वी पाठपुरावा केला. मियाल व्यवस्थापनासोबत भारतीय कामगार सेनेने निर्णायक चर्चा केली आणि मृत कर्मचारी गोविंद बागवे यांच्या पत्नीला कंपनीकडून 2 लाखांची मदत मिळवून दिली. ओमेगा एंटरप्रायझेस कंपनीकडून मिळवून दिलेले 2 लाख रुपये आणि कंपनीतील कामगारांनी सामाजिक बांधिलकी म्हणून जमा केलेले 1 लाख 26 हजार रुपये अशा एकूण 3 लाख 26 हजार रुपयांचा धनादेश दिवंगत बागवे यांच्या पत्नीला कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांच्या हस्ते देण्यात आला. या वेळी संजय कदम यांनी संकटाच्या काळात भारतीय कामगार सेना नेहमीच खंबीरपणे कामगारांच्या पाठीशी उभी राहील, असा शब्द दिला. याप्रसंगी भारतीय कामगार सेनेचे चिटणीस राजा ठाणगे, सहचिटणीस मिलिंद तावडे, युनिट कमिटीचे आनंद बैले, गिरीश तेली, सचिन शिंदे, नितीन सावंत, विठ्ठल अडागळे तसेच बागवे कुटुंबातील सिद्धी बागवे, अनिल बागवे, रुपेश बागवे उपस्थित होते.