प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचे दोन्ही पाय भाजपात; ईडी, सीबीआयच्या भीतीने धिप्पाड पुरूष गर्भगळीत झाले, संजय राऊत यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ईडी, सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर विरोधकांना संपवण्यासाठी केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी अनेकदा केला. याला घाबरूनच शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नेत्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पक्षाचा प्रमुख कोण होणार ही चर्चा सुरू असतानाही हा मुद्दा गाजतो आहे. कारण एकेकाळी भाजपने इक्लाब मिर्चीशी संबंध असल्याचा आरोप केलेले प्रफुल्ल पटेल यांचेच नाव अध्यक्षपदाच्या रेसमध्ये पुढे आहे. यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचे दोन्ही पाय भाजपात आहे, असे म्हटले आहे.

राजधानी दिल्लीत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, प्रफुल्ल पटेल यांचे दोन्ही पाय भाजपात आहे. ईडी, सीबीआयने अनेक राजकीय नेत्यांवरती दबाव टाकण्यासाठी गुन्हे दाखल केले. ही कमजोर हृदयाची माणसे आहे सगळी. आमच्यासारखी धाडसी लोक नाहीत, जे होईल ते पाहू म्हणणारी. आज अजित पवारांच्या बहुतांश आमदारांवर अशाच प्रकारचे खटले आहेत. गैरव्यवहार, आर्थिक अफरातफर, बँका लुटणे, चुकीच्या पद्धतीने जमिनीचे व्यवहार करणे, किंवा साखर कारण्यासंदर्भात… त्याच्यामुळे यांच्यावर दबाव आहे. त्यांच्या पक्षात 90 टक्के लोक सरंजाम आणि वतनदार आहेत. अशा प्रकारचे काम करून त्यांनी विधानसभा, लोकसभा लढल्या आणि जिंकल्या.

हसन मुश्रीफ सध्या देशाला, महाराष्ट्राला फार मोठे प्रवचन देशाला देत असतात. परंतु त्यांच्या घरी ईडीची रेड पडली तेव्हा ते आणि त्यांच्या कुटुंबाची वक्तव्य ऐका. आमच्या घरावर रेड पडली तेव्हा आमच्या घरातील बायका रडत समोर आल्या नाहीत. आम्ही धाडसाने सामोरे गेलो. नवाब मलिक, अनिल देशमुख गेले. पण यांच्या घरावर ईडीच्या कारवाया झाल्या, भल्या त्या खोट्या असतील तेव्हा धिप्पाड पुरूष कसे गर्भगळीत झाले हे महाराष्ट्राने पाहिले. त्याच्यामुळे ते जे काही सांगतात, प्रवचन देतात हिंमतीची, धाडसाचे, नैतिकतेची त्याच्यावर महाराष्ट्र विश्वास ठेवणार नाही, असे राऊत म्हणाले.

अजितदादांचा पक्ष पवारांचा; महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला ‘पटेल’ तेच करा, विलीनीकरणाच्या प्रश्नावर संजय राऊत स्पष्टच बोलले

अजित पवार यांच्या निधनानंतर भाजपने वृत्तपत्रांना पानभर जारिहाती दिल्या होत्या. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, अजित पवारांबाबत दिलेल्या जाहिराती ढोंग आहेत. भाजप सारखा ढोंगी पक्ष इतिहासात नाही. यापूर्वी भाजप बरोबर काम केलेल्या अनेकांचे निधन झाले. त्यांच्यावेळी अशा जाहिराती भाजपने दिलेल्या नाहीत. पण आता दिल्या असून अजित पवारांच्या अपघाताबाबत अनेकांनी शंकाही उपस्थित केल्या आहेत.

पवार कुटुंबात तीन दिवस शोक पाळण्याची परंपरा असल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले. यावर बोलताना राऊत म्हणाले की, पटेलांना पवार कुटुंबाचे मुखिया केले आहे का? कुटुंबातला शोक हा विधींपुरता असतो. पण साधारण हिंदू संस्कृतीमध्ये 13 दिवसांचा शोक असतो. अर्थात शरद पवार किंवा आम्ही ज्या विचारसरणीतून आलेलो आहोत त्याच्यात या कर्मकांडाला महत्त्व नाही हे खरे असले तरी प्रफुल्ल पटेल जे सांगताहेत ते त्यांची बाजू सांगताहेत. पण महाराष्ट्राच्या लोकभावना होत्या त्या समोर आलेल्या आहे.