
जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दोन्ही दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी सुरू झालेली ही चकमक बुधवारीही सुरू होती. उधमपूरच्या बनसंतगड भागात ही कारवाई करण्यात आली असून हिंदुस्थानी लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ यांनी संयुक्तपणे हे अभियान राबवले.
मंगळवारी दुपारी उधमपूर जिल्ह्यातील रामनगर आणि बनसंतगड दरम्यान असलेल्या चिगला बालोटा या दुर्गम भागात काही संशयास्पद दहशतवाद्यांच्या हालचाली होत असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या गुप्तचर माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी तातडीने शोध मोहीम हाती घेतली. या मोहिमेला ‘ऑपरेशन किया’ असे नाव देण्यात आले आहे. जवानांची तुकडी जगरेडा परिसरातील घनदाट जंगलात पोहोचली असता, तिथे लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी दुपारी 4 वाजेच्या सुमारास अचानक गोळीबार सुरू केला. जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आणि चकमकीला सुरुवात झाली.
Two terrorists neutralised by J&K police, Indian Army and CRPF in a joint encounter in Bansantgarh area of Udhampur: J&K Police https://t.co/9kB6JuPQLX
— ANI (@ANI) February 4, 2026
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त पथक घटनास्थळी पाचारण करण्यात आले. रात्रभर दोन्ही बाजूंनी अधूनमधून गोळीबार सुरू होता. या कारवाईवर लष्कर आणि पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत. डोंगरदऱ्यांचा आणि जंगलाचा फायदा घेत दहशतवाद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे त्यांना यश आले नाही. सध्या या भागात शोध मोहीम सुरू आहे.



























































