
डोंबिवली, ठाणे, वसई विरार, उल्हासनगर महापालिकांच्या महापौर – उपमहापौरपदासाठी आज निवडणूक झाली. काही महापालिकांमध्ये २०१९ पासून तर काही पालिकांमध्ये २०२१ पासून प्रशाकीय राजवट आहे. त्यामुळे तब्बल पाच ते सहा वर्षांनंतर पालिकांची सार्वत्रिक निवडणूक होऊन महापौर, उपमहापौर विराजमान झाले.
हर्षाली थवील केडीएमसीच्या महापौर
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदी शिंदे गटाच्या हर्षाली चौधरी थवील यांची तर उपमहापौरदी भाजपचे राहुल दामले यांची बिनविरोध निवड झाली. मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
भगवे फेटे आणि जय महाराष्ट्र
विशेष सर्वसाधारण सभा सुरू होताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गटनेते उमेश बोरगावकर, संकेश भोईर, विशाल गारवे, नीलेश खंबायत, तेजश्री गायकवाड, वंदना महिले, कीर्ती ढोणे, अपर्णा भोईर हे ८ नगरसेवक भगवे फेटे परिधान करून सभागृहात आले. यावेळी सभागृहात ‘जय महाराष्ट्र’ असा आवाज घुमला.
ठाण्याच्या महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक आज पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महापौरपदी शिंदे गटाच्या शर्मिला पिंपळोलकर यांची तर उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील यांची निवड झाली. सकाळी ११.३० वाजता ठाणे महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.
अजित पवार गटाचे शानू पठाण नाराज
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे दुःखाचे सावट असताना ठाणे महापालिकेत मात्र कुठेही दुःखाचे सावट दिसले नाही. महापौरपदाची घोषणा झाल्यानंतर ढोलताशांचा गजर घुमला. त्यामुळे या मुद्यावरून सत्ताधारी भाजप -शिंदे गटावर पालिकेतील अजित पवार गटाचे गटनेते शानू पठाण यांनी टीकेची झोड उठवत नाराजी व्यक्त केली.
वसईच्या महापौरपदी अजीव पाटील
विरार वसई विरार महापालिकेच्या महापौरपदी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार अजीव पाटील यांची बहुमताने निवड झाली. आजीव पाटील यांनी भाजपच्या अॅड. दर्शना त्रिपाठी यांचा पराभव केला. तर उपमहापौरपदाची माळ बविआच्याच मार्शल लोपीस यांच्या गळ्यात पडली. त्यांनी भाजपचे नारायण मांजरेकर यांचा पराभव केला. पीठासीन अधिकारी तथा पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली विरार येथील पालिका मुख्यालयात या निवडी झाल्या. यावेळी पालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी उपस्थित होते.
सभागृहात ‘शिट्टी’ घुमली
बविआच्या उमेदवारांचा महापौर, उपमहापौर निवडीत विजय होताच सभागृहात ‘शिट्टी’ या चिन्हाचा जयघोष आणि शिट्ट्यांचा आवाज घुमला. बविआचे अध्यक्ष माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी महापौर आणि उपमहापौरपदाची निवड करताना वसई-विरारमधील सामाजिक सलोखा जपला.
अश्विनी निकम उल्हासनगरच्या महापौर
उल्हासनगर : उल्हासनगर महापौरपदी शिंदे गटाच्या अश्विनी निकम तर उपमहापौरपदी भाजपचे अमर लुंड यांची बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी तथा रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या उपस्थितीत या निवडी झाल्या.
भाजपचा यू टर्न
उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत ७८ पैकी ४० जागांवर शिंदे गटाने तर ३७ जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. मतमोजणीनंतर भाजपने महापौरपदावर दावा केला होता. त्यामुळे महापौरपदासाठी भाजप आणि शिंदे गटात थेट लढत होईल अशी चिन्हे होती. मात्र भाजपने यू टर्न घेत उपमहापौरपदावर समाधान मानले.





























































