
>> वैश्विक n [email protected]
साधारणतः कोणतीही ‘टक्कर’ त्रासदायक, हानिकारक किंवा विनाशकारी असते. मुद्दाम कोणी आवडीने कशावर तरी जाऊन धडकत नाही. वाहनांच्या टक्करीसुद्धा तांत्रिक किंवा मानवी गफलतीने होतात. अंतराळातल्या टक्करीचं तसं नाही. निसर्गाच्या निर्हेतुक ‘नियमा’नुसार त्या घडतात. त्या कोणी ‘घडवत’ नाही. मात्र त्याचे परिणाम जाणवतातच. कधी भले तर कधी बुरे.
सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक महाप्रचंड शक्तीचा आणि 15 किलोमीटर रुंदीचा अशनी आदळला. परिणाम काय झाला तर त्यापूर्वी लाखो वर्षे पृथ्वीचा ताबा घेऊन सुखाने नांदणारे डायनॉसॉर एका फटक्यात नाहीसे झाले. या महाकाय आणि तुलनेने क्षीणगती सजीवांना पळ काढायला वाव मिळाला नाही व पळून जाणार तरी कुठे? अवघ्या पृथ्वीभर पसरलेल्या डायनॉसॉरना छोटय़ाशा गुहेत वगैरे ‘लपता’ येणं शक्य नव्हतं. शिवाय त्या धडकेने निर्माण केलेली भयावह कंपनं आणि उष्णता एवढी भीषण होती की, बिचारे डायनॉसॉर नामशेष झाले. त्यांची प्रचंड आकाराची अंडीसुद्धा नष्ट झाली आणि नवी ‘प्रजा’ जन्माला येण्याची संधी मावळली. आपल्या हिंदुस्थानातही हे महाकाय सजीव एकेकाळी असल्याचा पुरावा आहे.
ही गोष्ट झाली साडेसहा कोटी वर्षांपूर्वीच्या विनाशी टक्करीची. अर्थात, त्यानंतरच इतर प्राण्यांची योग्य वाढ झाली आणि माणसं ‘प्रगत’ म्हणून पुढे आली… ‘मरणात खरोखर जग जगते’ ते असे!
आजचा विषय एका वेगळ्याच ‘उपकारक’ म्हणाव्या अशा टक्करीचा. 5 अब्ज वर्षांपूर्वी आपला सूर्य जन्माला आला आणि त्यासोबतच त्याचं कुटुंबसुद्धा अवतरलं. अनेक ग्रह त्याभोवती गरगरायला लागले. त्यातला आपला जीवनदाता ग्रह अर्थातच पृथ्वी, परंतु समजा एक विशिष्ट धडक पृथ्वीला बसली नसती तर आपण अस्तित्वात असतो का? हाच एक प्रश्न आहे.
सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी आपल्या ग्रहाच्या नवजात अवस्थेच्या काळातच साधारणपणे मंगळ ग्रहाच्या आकाराचा ‘थेया’ नावाचा ग्रह आपल्याला (म्हणजे पृथ्वीला) जोरदारपणे टक्करला! या ‘थेया’ची गोष्ट म्हणजे एक संकल्पना मानली जाते. या हायपोथेटिकल ‘थेया’ने पृथ्वीला टक्कर दिल्यानेच आज आपली पृथ्वी नि त्यावरची आपल्यासकटची जीवसृष्टी जशी आहे तशी दिसते असं ही ‘थेया-थिअरी’ सांगते.
या सिद्धांतानुसार काय काय घडलं? वास्तविक अशा भीषण टक्करीने पृथ्वीचे तुकडेच झाले असते तर या संकल्पनेची चर्चा करायला आपण नसतोच. विश्वनिर्मिती ग्रहमालेचा जन्म याबाबत खगोल अभ्यासक अनेक बाजूंनी विचार करतात. त्यातलीच एक ‘थेया-थिअरी.’
सध्याच्या ‘बातम्या’मध्ये जसं ‘सूत्रां’कडून असं समजतं वगैरे येतं तसंच ‘थेया’ बाबतचं ‘सूत्र’ सांगतं की, या थेया ग्रहाची पृथ्वीला बसलेली धडक एवढी भीषण होती की, त्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग पार वितळून गेला. मग त्यातून एक गोलक बाहेर फेकला गेला तो आपला चंद्र! त्यामुळे चंद्रनिर्मिती पृथ्वी आणि थेया यांच्या संयोगातून झाली असावी.
या प्रचंड टक्करीमुळे ‘थेया’सुद्धा वितळून पृथ्वीत सामावून जायला हवा होता, परंतु अलीकडच्या संशोधनानुसार तसं पूर्णत्वाने घडलं नाही. या दोन्ही ग्रहांच्या द्रव्यातून तयार झालेले विशाल आकाराचे दोन ‘खंड’ आजही आफ्रिका खंडाच्या आणि पॅसिफिक महासागराच्या तळाशी आहेत. त्यांना ‘लार्ज लो व्हेलॉसिटी प्रॉव्हिन्सेस’ किंवा ‘एलएलव्हीपी’ म्हटलं जातं. पृथ्वीवरच्या अथांग पाण्यात बुडून हे खंडप्राय तुकडे थंड झाले नि तसेच राहिले.
‘थेया’ ग्रहाचा गाभा प्रचंड लोहयुक्त होता. तो पृथ्वीच्या गाभ्यात विलीन झाला. त्यामुळे या गाभ्याची घनता मोठय़ा प्रमाणात वाढली. याशिवाय ‘थेया’वरही पृथ्वीसारखं बरचं पाणी होतं (म्हणे!) ते सारं पृथ्वीवरच्या जलसाठय़ात वाढ करणारं ठरलं. त्यामुळेच आपला ग्रह ‘हॅबिटेबल’ किंवा वसाहतयोग्य बनला.
याहून महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे या धक्क्याने पृथ्वी साडेतेवीस अंशात कलली. परिणामी पुढे ऋतुचक्र निर्माण झालं. पृथ्वीचा वेग मंदावला आणि ती स्वतःभोवती आताप्रमाणे 24 तासांत फिरू लागली. थेयामुळेच पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील ‘प्लेट टॅक्टॉनिक’ तयार होण्यास मदत झाली असावी असंही म्हटलं जातं.
जर ‘थेया’ पृथ्वीला धडकला नसता तर पृथ्वीचा गाभा लहान राहिला असता. मॅग्नॅटिक फिल्ड खूपच क्षीण अवस्थेत असतं…आणि अनेक खंडांची निर्मिती न होता तसेच ऋतुचक्राचं आवर्तन न घडता, पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली नसती. त्यामुळे कदाचित काल्पनिक असली तरी ‘थेया’ची ही कहाणी आपल्या अस्तित्वाला सहाय्यक ठरून त्याचा विचार करण्याच्या ‘ध्येया’पर्यंत घेऊन आली एवढं खरं…आणि खरंच अशी टक्कर झाली असेल तर थेया ‘थोर तुझे उपकार’ असंच म्हणायला हवं!


























































