
आशियाई नेमबाजीच्या रणांगणावर ऑलिम्पियन ईशा सिंहने पुन्हा एकदा आपली कमाल दाखवताना हिंदुस्थानसाठी सुवर्णनेम साधला. आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ईशाने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात दुहेरी सुवर्ण जिंकत हिंदुस्थानचा झेंडा उंचावला. मात्र पुरुष गटात विश्वविजेत्या सम्राट राणाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
अंतिम फेरीत काही काळ पिछाडीवर पडलेली 21 वर्षीय ईशा सिंह डगमगली नाही. थंड डोक्याने आणि अचूक नेमबाजी करत तिने 239.8 गुणांची जबरदस्त कामगिरी नोंदवत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. चायनीज तैपेईच्या चेंग येन चिंग (235.4) आणि यू ऐ वेन (217.7) यांना मागे टाकत ईशाने वैयक्तिक प्रकारात बाजी मारली. याच प्रकारात सांघिक स्पर्धेतही हिंदुस्थानला सुवर्ण मिळवून देण्यात तिचा मोलाचा वाटा ठरला.
ईशाने 19व्या वर्षी जकार्तामध्ये पहिला महाद्विपीय किताब पटकावला होता, तर गेल्या वर्षी चीनच्या निंगबो येथे आयएसएसएफ विश्वचषकातही ती सुवर्णविजेती ठरली होती. आशियाई स्पर्धेतले हे तिचे दुसरे सुवर्ण तिच्या सातत्यपूर्ण वर्चस्वाची साक्ष देणारे ठरले.
पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात सर्वांचे लक्ष विश्वविजेता सम्राट राणाकडे होते. पात्रता फेरीत 581 गुणांसह दुसऱया क्रमांकावर राहिलेल्या सम्राटने अंतिम फेरीत मात्र अपेक्षित धार दाखवू शकला नाही. 220.3 गुणांसह त्याला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. उझबेकिस्तानच्या व्लादिमीर स्वेचनिकोव (242.0) आणि कझाकिस्तानच्या व्हॅलेरी रखिमझान (241.0) यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पटकावले. श्रवण पुमार चौथ्या स्थानावर राहिला.
या प्रकारात हिंदुस्थानने सांघिक रौप्य पदक मिळवले. सम्राट (581), श्रवण (578) आणि वरुण तोमर (573) यांनी मिळून 1732 गुण नोंदवले. उझबेकिस्तानचेही तेवढेच गुण झाले; मात्र त्यांच्या 58 इनर-10च्या तुलनेत हिंदुस्थानचे 52 इनर-10 असल्याने सुवर्णपदक उझबेकिस्तानकडे गेले. कझाकिस्तान 1731 गुणांसह तिसऱया स्थानावर राहिला. या स्पर्धेत हिंदुस्थानने 118 नेमबाजांचा सर्वात मोठा संघ उतरवला असून कझाकिस्तानचा 35 नेमबाजांचा संघ आकाराने दुसऱया क्रमांकावर आहे.



























































