
क्रिकेटच्या नियमांमध्ये मोठी उलथापालथ झाली असून मेरिलबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) 2017च्या कोड ऑफ लॉजची चौथी आवृत्ती जाहीर केली आहे. 2022नंतर प्रथमच प्रकाशित झालेल्या या आवृत्तीत तब्बल 73 नियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. हे नवे नियम 1 ऑक्टोबर 2026पासून लागू होतील. ‘एमसीसी’च्या मते हे बदल क्रिकेटचे नियम आधुनिक खेळाशी सुसंगत, अद्ययावत आणि सर्वांसाठी समावेशक ठेवण्यासाठी करण्यात आले आहेत. या नव्या नियमांचा खेळावर तत्काळ आणि थेट परिणाम होणार आहे.
एमसीसीच्या नव्या कोडमधील प्रमुख नियमबदल
- कसोटीतील अखेरच्या षटकातील नियम बदलला ः कसोटी क्रिकेटमध्ये सत्राच्या किंवा दिवसाच्या अखेरच्या षटकात विकेट पडल्यास खेळ थांबवण्याची परंपरा होती. मात्र आता नवा फलंदाज मैदानात येणारच आणि पूर्ण ओव्हर खेळवला जाईल. एमसीसीच्या मते जुना नियम गोलंदाजी संघावर अन्याय करणारा होता आणि खेळातील थरार कमी करत होता. याच नियमा अंतर्गत ड्रिंक्स ब्रेकच्या सुरुवातीला पंचांना बेल्स काढण्याची गरजही राहणार नाही.
- ओव्हरथ्रोची स्पष्ट व्याख्या ः पहिल्यांदाच ओव्हरथ्रोची ठोस व्याख्या करण्यात आली आहे. विकेटवर थ्रो करून रन रोखण्याचा किंवा रनआऊटचा प्रयत्न केला गेला आणि चेंडू पुढे निसटला, तरच तो ओव्हरथ्रो मानला जाईल. बाउंड्रीजवळ चेंडू अडवताना किंवा दुसऱया फिल्डरकडे देताना हातातून निसटला, तर तो मिसफील्ड मानला जाईल, ओव्हरथ्रो नाही.
- जाणीवपूर्वक शॉर्ट रनवर कडक कारवाई ः हा नियम आधीपासून लागू आहे, मात्र आता अधिक स्पष्ट करण्यात आला आहे. जाणीवपूर्वक शॉर्ट रन घेतल्यास फलंदाजाला रन मिळणार नाहीच, शिवाय पुढील चेंडूसाठी कोणता फलंदाज स्ट्राईकवर राहील हे क्षेत्ररक्षण करणारा कर्णधार ठरवेल.
- बाउंड्रीवरील ‘बनी हॉप’ झेल बंद ः फिल्डरने हवेत उडी मारून बाउंड्रीबाहेर पाऊल टेकवून झेल घेणे आता मान्य नाही. झेल टिपल्यानंतर फिल्डरने पूर्णपणे बाउंड्रीच्या आतच लँड करणे आवश्यक आहे. बाउंड्रीला स्पर्श झाला, तरी चेंडू बाउंड्री मानला जाईल.
- ‘डेड बॉल’च्या नियमात बदलला ः आता चेंडू गोलंदाज किंवा विकेटकिपरकडे असणे आवश्यक नाही. चेंडू कोणत्याही फिल्डरकडे आला असेल किंवा मैदानावर स्थिर असेल आणि पंचांना खेळ थांबवायचा वाटला, तर ते डेड बॉल घोषित करू शकतात, जरी एखादा खेळाडू खेळ सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत असला तरीही.
- यष्टीरक्षकाच्या पोझिशनमध्ये सवलत ः गोलंदाज रन-अप घेत असताना यष्टीरक्षकाचे हात स्टंप्सच्या पुढे असले तरी तो नो-बॉल मानला जाणार नाही. मात्र चेंडू सुटताना यष्टीरक्षक पूर्णपणे स्टंप्समागे असणे आवश्यक आहे.
- हिट विकेट नियम स्पष्ट ः शॉट खेळल्यानंतर तोल जाऊन फलंदाज स्टंप्सवर आदळला, तर चेंडू कितीही दूर गेला असला तरी तो हिट विकेट आऊट ठरेल. मात्र फिल्डरशी धडक लागून स्टंप्सवर पडल्यास फलंदाजाला आऊट दिले जाणार नाही.
- विजयानंतरच्या गैरवर्तनाने निकाल बदलू शकतो ः सामना जिंकल्यानंतरही पंच मैदानावर असताना एखादा गंभीर शिस्तभंग झाला, तर शिक्षा देऊन निकाल बदलला जाऊ शकतो. अशा स्थितीत निकाल रद्द झाल्यास सामना पुन्हा सुरू केला जाऊ शकतो. एमसीसीने स्पष्ट केले की, एकापेक्षा अधिक गुन्हे झाल्यास पेनल्टी रन क्रमाने दिले जातील.
- नॉन-स्ट्रायकरच्या विकेटला चेंडू लागला तर ‘बोल्ड’ नाही ः फलंदाजाचा फटका नॉन-स्ट्रायकरच्या विकेटला लागून परत स्ट्रायकरच्या विकेटवर आदळला, तरी तो बोल्ड आऊट मानला जाणार नाही.
- विकेट अडवण्यावर कठोर भूमिका ः आऊट होणे टाळण्यासाठी फलंदाजाने बॅट टाकली किंवा फेकली, तर तो ऑब्स्ट्रक्टिंग द विकेट आऊट ठरू शकतो. अशा आऊटनंतरही पुढील स्ट्राईक कोण घेईल हे क्षेत्ररक्षण करणारा कर्णधार ठरवेल.
- लॅमिनेटेड बॅटला मंजुरी ः स्वस्त असलेल्या लॅमिनेटेड बॅट्स आता सर्व प्रकारच्या प्रौढ क्रिकेटमध्ये वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. याआधी त्या फक्त ज्युनियर क्रिकेटपुरत्याच मर्यादित होत्या. या नियमामुळे क्रिकेट अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि रोमांचक बनेल, असा एमसीसीचा विश्वास आहे.
- एमसीसीच नियमांचा बॉस ः 1787मध्ये लंडनमध्ये स्थापन झालेला मेरिलबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) हाच क्रिकेटच्या नियमांचा अंतिम मालक आहे. 1788मध्ये पहिल्यांदा नियम लिहिणाऱया एमसीसीकडे आजही क्रिकेट नियमांचा काॅपीराईट आहे. एमसीसी असो वा जागतिक क्रिकेट, नियमांचा रिमोट एमसीसीच्याच हातात आहे!





























































